वार्ताहर/ कराड
जवळपास सव्वा वर्षांपासून लॉकडाऊनने होरपळणाऱया जिल्हय़ात एप्रिल महिन्यात आलेल्या दुसऱया लाटेतही कडक लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी जवळपास दोन महिने कराड शहरात सन्नाटा पसरला होता. तर शहरातील रस्ते सुनसान दिसत होते. मात्र शासनाने सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याने तब्बल दोन महिन्यानंतर कराडच्या बाजारपेठेसह रस्त्यावर नागरिकांची वर्दळ दिसली.
कराड तालुका कोरोनासाठी सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट ठरला आहे. पहिल्या लाटेतही तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने जवळपास वर्षभराचा लॉकडाऊन सहन करावा लागला. तर राज्यात सर्वत्र दुसरी लाट ओसरत असतानाही केवळ बाधितांच्या फुगलेल्या आकडय़ांच्या खेळामुळे सातारा जिल्हय़ात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. शासनाने सोमवारपासून किमान अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.
सोमवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेसह सर्व रस्त्यावर वाहने व नागरिकांची वर्दळ दिसत होती. भाजीमंडई परिसरातही भाजी विक्रेते व ग्राहकांची वर्दळ होती. शहरातील किराणा, धान्य, बेकरी, भाजापाला, फळे, दूध केंद्रे आदी प्रकारची दुकाने सुरू झाल्याने नागरिकही खरेदीसाठी बाहेर पडल्याचे पहावयास मिळाले. घराबाहेर पडणाऱया नागरिकांकडून मास्क व सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्यात आले.








