प्रतिनिधी / बेळगाव
निसर्गसौंदर्याने नटलेल्या बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो येथे नागरिकांचा विरोध असतानाही कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्लास हाऊसजवळ मोठी चर खोदण्यात आली आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या पारसिरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम नको, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली असतानाही त्यांचा विरोध झुगारून परिसर भकास करण्याचा प्रयत्न चालविला आहे. व्हॅक्सिन डेपो येथे यापूर्वीही विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु नागरिकांनी याला तीव्र विरोध करून व्हॅक्सिन डेपोचे सौंदर्य अबाधित ठेवले आहे. शहर परिसरात इतकी मोठी जागा सध्या तरी उपलब्ध नाही. व्हॅक्सिन डेपो येथे दररोज हजारो लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात. निसर्गप्रेमी येथे संशोधन करीत असतात. त्यामुळे येथे विकासकामे राबवू नयेत, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली होती. तरीदेखील कामाला सुरुवात करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









