पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए, एनआरसी कायदा लागू करून देश हिताच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. या कायद्याचा सन्मान करणे देशातील सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. तसेच या कायद्याबाबत गैरप्रचार करून त्याला विरोध करणाऱयाना सामान्य नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन माजी आमदार दामू नाईक यांनी केले.
उद्या शुक्रवार दि. 3 रोजी पणजी येथे भाजपातर्फे सीएए व एनआरसी कायद्याच्या समर्थनार्थ होणाऱया जाहीर सभेच्या पूर्व तयारीसाठी आयोजित केलेल्या वास्को भाजपा मंडळाच्या बैठकीत माजी आमदार दामू नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा, दक्षिण गोवा भाजपा जिल्हा अध्यक्ष तुळशिदास नाईक, मुरगांवचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर, भाजपा कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, संतोष लोटलीकर, वास्को भाजपा गटाध्यक्ष दीपक नाईक्, महिला मोर्चा अध्यक्ष सुप्रिया नाईक्, सचिव संदीप नार्वेकर, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, फेड्रीक हेन्रीक व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकारने सदैव देश हितासाठी कायदे लागू करून येथील जनतेचे हित जपलेले आहे. सीएए एनआरसी कायदा लागू करण्यात आल्याने येथील अल्पसंख्याकांना कोणताच धोका निर्माण होणार नाही. तसेच गोव्यातील अल्पसंख्याकांनी याविषयी घाबरून न जाता या कायद्याचा आदर केला पाहिजे. गोवा सरकार अल्पसंख्याकाचा सदैव सन्मानच करीत आल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार कार्लूस आल्मेदा यांनी पणजीतील जाहीर सभेत वास्केतून एक हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, गटाध्यक्ष दीपक नाईक यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यतीन कामुर्लेकर तर माजी गटाध्यक्ष राजेंद्र डिचोलकर यांनी आभार मानले.









