प्रतिनिधी/ कुडचडे
राज्यात व उर्वरित देशात विरोधी पक्षांनी नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विरोधात जे धोरण चालविले आहे ते अत्यंत चुकीचे असून फक्त लोकांची दिशाभूल करणे हा यामागचा हेतू आहे. सदर कायद्याबद्दल सविस्तर माहिती नसताना विरोधक आपले ढोल वाजवत सुटलेले आहेत, अशी टीका स्थानिक आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी कुडचडेतील बैठकीत बोलताना केली.
त्यामुळे सदर कायद्याची सविस्तर माहिती प्रत्येकाकडे पोहोचावी या दृष्टिकोनातून 3 रोजी दुपारी 3 वा. पणजीतील आझाद मैदानावर भारतीय जनता पक्षातर्फे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. या सभेस कुडचडेतील कार्यकर्त्यांनी व अन्य लोकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन काब्राल यांनी केले.
कुडचडे भाजप मंडळातर्फे सदर सभेविषयी सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना मिळावी याकरिता सर्वोदय हायस्कूलच्या सभागृहात ही बैठक आयोजिण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सर्वानंद भगत, कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत देसाई, सचिव राजेंद्र वस्त, कुडचडेचे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक नाईक, महिला मोर्चा अध्यक्षा रजनी नाईक, शेल्डेचे सरपंच कायतान, नगरसेवक फेलिक्स फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.
आज राज्यात तसेच केंद्रात भाजप सरकार व्यवस्थित वाटचाल करत आहे. त्यामुळे आणि कोणतेच मुद्दे या विरोधी पक्षांना सापडत नसल्याने ते हा नागरिकत्व कायदा दुरुस्तीचा मुद्दा उठवून व त्याला अन्य मुद्दे जोडून लोकांमध्ये फूट घालण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका सर्वानंद भगत यांनी केली. पणजीत होणाऱया सभेस सर्वांची उपस्थिती गरजेची आहे हे लक्षात घेऊन मंडळाने केलेल्या आखणीस कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे व उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वास सावंत देसाई यांनी केले. राजेंद्र वस्त यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, तर दत्तात्रय प्रभुदेसाई यांनी आभार मानले.









