सोलापूर / प्रतिनिधी
श्री सिध्दरामेश्वर महाराज की जय, हर्र बोला हर्रच्या जयघोषात आणि योगदंदाडास नागफणी, बाशिँग बांधून लाईटींगच्या सजावाटीने होमविधीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. तर राञी 8 वाजून 28 मिनिटांनी कुंभार कन्या कुमारव्वा देवीचे अग्नीप्रवेश धार्मिक विधी सोहळा उत्साहात पार पडला.
मानाचे पहिले व दुसरे नंदिध्वजांच्या महापूजनाने हिरेहब्बू वाड्यातून योगदंड मिरवणुकीस प्रारंभ झाले. पसारेवाडा येथे मिरवणुकीचा 14 मिनिटाचा विसावा घेण्यात आला. तर यावेळी राजू थोबडे यांनी योगदंडास नागफणी तर अनिल हिरेमठ यांनी बाशिंग बांधले. त्यानंतर मिरवणूक होममैदानाकडे प्रस्थान झाले. अवघ्या 20 मिनिटात मिरवणूक होम मैदानावर दाखल झाले. त्यानंतर राजशेखर हिरेहब्बू यांनी होमकुंडात उतरून कुंभार परिवाराने तयार केलेल्या प्रतिकात्मक रुपातील बाजरीच्या पेंडीची कुुंभार कन्येस शालू व सौभाग्य अलंकाराने सजविले. कुंभार कन्येस सजविण्यासाठी हिरेहब्बू यांच्याकडून नववधूस साडी, मणीमंगळसूत्र, बांगडया, जोडवे, हारदांडा देण्यात आले. तसेच कन्येला माहेरकडूनही शालू, मणीमंगळसूत्र, बांगड्या, जोडवे आदी सौभाग्य अलंकार देण्यात आले. दोन्ही कुटुंबाकडून आलेले सौभाग्य अलंकाराने सजविल्यानंतर तिची विधीवत पूजा करून हिरेहब्बूंनी कुंभारकन्येला अग्नी देऊन कुंभार परिवाराला विड्याचा मान दिला. त्यानंतर श्री सिध्दरामेश्वरांची पालखी, हिरेहब्बू मानकरी व योगदंड होमकुंडास पाच प्रदिक्षणा घालून भाकणुकीसाठी प्रस्थान झाले.
फडकुले सभागृहाजवळ बांधलेला देशमुखांचा वासरू हिरेहब्बूंच्या स्वाधिन करण्यात आले. देशमुख परिवाराच्यावतीने पार्क मैदानावरील लिंगाचे पूजन करून पुन्हा हिरेहब्बू व देशमुख परिवार वासाराची पूजा केले. वासरासमोर गूळ, खोबरे, कडधान्य, कडबा, गाजर आणि पाणी दिले. त्या वासराच्या खाण्यापिण्यावरून व मलमूत्राच्या आधारावरून गुरुवारी भाकणूक झाली. ही भाकणूक शिवानंद हिरेहब्बू यांनी सांगितले. होमप्रदीपन व भाकणूकच्या धार्मिक विधीनंतर रात्री 10.30 वाजता योगदंड श्री मल्लिकार्जुन मंदिरात दाखल झाले. मानकरी व हिरेहब्बू प्रसाद घेतल्यानंतर उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
गुरुवारी दोन वेळा निघाली मिरवणूक
अक्षता सोहळ्यानंतर हळद काढण्याचा करमुटगीचा धार्मिक विधी सकाळच्या सत्रात पार पडला. यावेळी योगदंंड व पालखी रथ मिरवणुकीने श्री मल्लिकार्जुन मंदिरातून श्री सिध्दरामेश्वर मंदिरात आले. तर होमप्रदिपन सोहळा या कुंभार कन्येच्या अग्निप्रवेश या धार्मिक विधीसाठी सायंकाळी संभाळच्या निनादात योगदंडाची मिरवणूक निघाली.