ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपुरातील जामठा येथे बुटीबोरी पोलिसांची जीप उलटून झालेल्या अपघातात एक पोलीस शिपाई ठार झाला. तर चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. मध्यरात्री 12 वाजता ही घटना घडली.
जीपचालक खुशाल गुलाबराव शेगोकर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात, हेडकॉन्स्टेबल साजिद सय्यद, महिला पोलिस शिपाई हर्षा शेंडे व छाया धोपटे या जखमी झाल्या आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई शेगोकर हे शनिवारी रात्री पोलीस ठाण्यातील चार महिला पोलिसांना घरी सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, मध्यरात्री 12.30 च्या सुमारास जीपसमोर एक डुक्कर आल्याने भरधाव वेगातील जीप बाजूच्या नाल्यात उलटली. या अपघातात चालक शेगोकर यांचा मृत्यू झाला. तर चार महिला पोलीस जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.









