प्रतिनिधी / वाकरे
नागदेववाडी( ता. करवीर ) येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत भ्रष्टाचार झाला असेल तर जरूर चौकशी करावी ,या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे विरोधकांनी सिद्ध केल्यास मी गावासमोर जाहीर माफी मागतो.भ्रष्टाचार सिद्ध न केल्यास विरोधकांनी जाहीर माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असा इशारा पेयजल योजना समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच विश्वास कामीरे,ग्रा.पं.सदस्य योगेश ढेंगे यांनी पत्रकार बैठकीत दिला.
विरोधी गटाच्या लोकांनी परवा पत्रकार परिषद घेऊन पेयजल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याबाबत खुलासा करण्यासाठी पत्रकार बैठक घेण्यात आली.
कामिरे यांनी विरोधकांच्या आरोपाबाबत खुलासा करताना दि. २८ जुलै २०१७ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामसेवकांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या सचिवपदी योगेश ढेंगे यांची निवड केल्याचे सांगितले, त्यावेळी तक्रारदार उत्तम दिवसे यांच्या पत्नी विद्या दिवसे या सदस्य होत्या.तसेच भीमराव भरणकर यांच्या पत्नी सरपंच असताना शारदा भरणकर यांनी सभा बोलावली होती. पेयजल योजनेच्या सचिवपदी ग्रामसेवक असावेत अशा शासकीय आदेशाची मागणी केली होती, मात्र तो मिळालेला नसल्याचा खुलासा यावेळी करण्यात आला.आपण नागपूरला स्वखर्चाने जाऊन गावासाठी योजनेचा प्रस्ताव मंजूर केला. फिल्टरसाठी ३५ लाख खर्च झाले नसून,ती १७ लाखांची स्वतंत्र योजना होती. अद्याप फिल्टर चालू नाही, मग गढूळ पाणी येणार कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गढूळ पाणी का येते ते विद्यमान सदस्यांची शोधून काढावे असे आव्हान त्यांनी दिले.
विरोधक सदस्य असताना योजना बालिंगेला का वर्ग केली नाही,शंभर फुटावर विनामीटर पाणी येते, आमच्या काळात ११ लाख वीज बिल बाकी होते ,आणि ते भरले,आज रोजी वीज बिल २० लाख का थकले आहे याकडे विरोधक का लक्ष देत नाहीत,७२/२ गटामध्ये ठराव करून महापालिकेचे पाणी दिले आहे. पाईपलाईनला हेड जादा असल्याने पाणी पोहचत नाही. विरोधकांनी ठेकेदार बदलला व पाहुण्याला ठेका दिला. २०१६ मध्ये पाणी योजनेचा ताबा घेतला असून काम पूर्ण झाले आहे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार, पत्रानुसार सर्व बिले अदा केली आहेत. सचिव योगेश ढेंगे यांनी विरोधकांनी राजकीय हेतूने आरोप केल्याचे सांगून ग्रामसभेत ठराव होऊन आपली निवड झाली आहे,जिल्हा परिषद अधिकारी यांच्या नियमानुसारच बिल अदा केली आहेत असा खुलासा त्यांनी केला.
यावेळी माजी सरपंच शरद निगडे, शिवाजी ढेरे, तंटामुक्त अध्यक्ष राम पाटील, योगेश ढेरे, समिती सदस्य वसंत पाटील, उत्तम निगडे ,निवृत्ती निगडे, पांडुरंग निगडे, भिकाजी ढेरे उपस्थित होते.
Previous Articleजिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उत्तम समन्वयाने परिस्थिती हाताळा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
Next Article पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 35,409 वर








