प्रतिनिधी / वैराग
मुंगशी ( वा ) येथील नागझरी नदीच्या महापूरात वाहून गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्यांचा मृतदेह चार दिवस लोटले तरी थांगपता लागेना. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे. बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी नागझरी नदीच्या पुरात निवृत्ती रंगनाथ ताटे हे शेतात अडकले होते. त्यांची नदी काठी दोन एकर शेती असल्याने ते सोयाबीन पिकाच्या रासीची कामे करत होते. अचानक नदीच्या पात्र भरून पाणी शेतातून वाहू लागले. त्यावेळी त्यांना राजकुमार खंबे व घोडके या युवकांनी पाण्याच्या बाहेर नेत वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र पाणी नदीपात्राबाहेर वाढत सर्वत्र पाणीच-पाणी वाहत होते. त्यावेळी ताटे यांनी घोडके यांच्या पत्राशेडवर चढून बसले. मात्र दिवस रात्र सुरु असलेल्या मुसळदार पावसात ते भिजले. अखेर चढून बसलेले पत्राशेड पाण्यात कोसळल्याने जोरदार पाण्यात प्रवाहात निवृत्ती ताटे हे वाहत जाताना ग्रामस्थ पहात होते. मात्र पाण्याचा रुद्रावतार व आहाःकार पाहता कोणाचेही धाडस जीव वाचवण्याचा प्रयत्न करु शकले नाही.
त्यांच्या नातेवाईकांनी फोनवरून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहीती कळवली. मात्र प्रशासनाचे अधिकारी येण्या आगोदरच ते वाहत गेले होते. मयत ताटे यांचा शेत- शिवार, नदी काठच्या झाडा -झुडपात शोध घेणे सुरुच आहे. घटनास्थळापासून पंधरा ते वीस किलोमीटर दुरपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याचे नातू सौदागर क्षीरसागर यांनी सांगितले. तर घटना घडून चार दिवस झाले. त्यांना शोधण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यात भागाईवाडी नदी शिवार, मोहोळ तालुक्यात वाळूज, देगाव, डिकसळ, घाटणे आदी नदी शिवारात शोध घेतला. मात्र त्यांचा शोध घेणे अवघड झाले आहे. नदीच्या शेती शेजारील गाळात, काटा कुट्यात अथवा बंधाऱ्यात पाहीले असता ते मिळत नसल्याचे त्यांचे नातेवाईक कमलाकर क्षीरसागर यांनी सांगितले.









