लॉकडाऊन शिथिल झाला. हॉटेल्स उघडली. सकाळी दूध घेताना नागजंपी भेटला तेव्हा त्याला या बातमीची आठवण करून देत म्हटलं, “नाग्या, हॉटेलं उघडली आहेत. जुने दिवस आले. आपण सकाळी दूध घेतल्यावर चालत जाऊ आणि येताना उडप्याकडे इडली-वडा, डोसा-उत्तप्पा वगैरेचा आनंद घ्यायला हरकत नाही.’’
“होय रे. नंदिनीचं हातचं तेच तेच खाऊन खाऊन आणि प्रत्येक पदार्थ खूप चांगलं झालं असं बोलून बोलून जीभ कसं रडकुंडीला आलंय रे,’’ नाग्या कळवळून म्हणाला.
“चांगला स्वयंपाक करतात रे वहिनी.’’
“तुझं बायको वाईट करतं का? पण तुलाही असं वाटतं ना की उडप्याकडं जाऊन इडली-गिडली खावी. शेवटी उडपी ते उडपी असतंय बघ.’’
“मी काय म्हणतो नाग्या, इतके महिने आपण हॉटेलिंग केलं नाही. आम्ही काय एखादी प्लेट इडली किंवा वडा खाऊन उठणारी मरतुकडी माणसं. तू नाश्त्यासाठी बसल्या बैठकीला तीन-चार कट डोसे आणि अर्धा डझन फिल्टर कॉफीचे कप सहज संपवणारा बहाद्दूर. लॉकडाऊनमुळे तुझा बराच खर्च वाचला असेल. हॉटेलमध्ये तब्येतीनं खाणारा माणूस घरी तितका तोंड चालवू शकत नाही. उडप्याकडचा कलात्मक जाळीदार डोसा वेगळाच… घरी भूक भूक केली की बायको कंटाळून डोसे थांबवते आणि जाड रोडग्यासारखे उत्तापे ताटात आदळते. थोडक्मयात, मला म्हणायचं काय आहे… गेल्या सहा महिन्यात हॉटेलिंग नव्हतं. केस देखील तू घरीच बायकोकडून कापून घेतलेस. तुझं सेव्हिंग बरंच झालं असेल. तेव्हा हॉटेलगमनाचा शुभारंभ उडप्याकडे जाण्याऐवजी एखाद्या महागडय़ा वातानुकूलित सामिष भोजनालयाला भेट देऊन करायला काय हरकत आहे?’’
“तुझं मुद्दा अर्धवट असतंय बघ.’’
“कसं काय?’’
“अरे हॉटेलिंगचं खर्च वाचलं. पण नंदिनीनं रोज यू टय़ूबवर बघून वेगवेगळं रेसिपी करायचं आणि मला सरप्राईज द्यायचं धडाका लावलं. काही काही पुढारी कसं, अर्थशास्त्राचं अक्कल नसलं तरी कोणाचा सल्ला न घेता स्वतःच्या डोक्मयानं निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेचं वाट लावतंय, तसं नंदिनीनं रोज नवीन रेसिपी, त्यासाठी घटक पदार्थ आणून मला खर्चात पाडलं. ते रेसिपी खाऊन पोट बिघडलं की डॉक्टरचं खर्च. शिवाय रोज व्हॉट्सअपवर वाचून नवीन नवीन इम्युनिटी काढा बनवलं, मला पाजलं स्वतः घेतलं आणि दोघांचं ऍसिडिटी वाढवलं. पाईल्स झालं नाय ते देवाचं कृपा.’’
मी निरुत्तर झालो.








