राज्य सरकारची घोषणा,नियमावली पूर्वीप्रमाणेच
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना नियंत्रणासाठी घोषित करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यूला राज्य सरकारने कालावधीवाढ दिली आहे. आता हे निर्बंध सोमवार दि. 30 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहेत. ही नियमावली पूर्वीप्रमाणेच राहणार आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे 30 ऑगस्टपर्यंत संपूर्ण कर्नाटक राज्यात प्रतिदिन रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे. तसेच शुक्रवारी रात्री 9 पासून सोमवारी पहाटे 5 पर्यंत प्रत्येक आठवडय़ात विकेंड कर्फ्यू लागू केला जाणार आहे. हा विकेंड कर्फ्यू केरळ व महाराष्ट्राला लागून असणाऱया जिल्हय़ांमध्ये असेल. बेळगाव, बिदर, विजापूर, गुलबर्गा, मंगळूर, कोडगू, म्हैसूर व चामराजनगर हे विकेंड कर्फ्यूचे जिल्हे असतील, असे कळविण्यात आले आहे. 30 ऑगस्टपर्यंत सामाजिक, राजकीय किंवा इतर मेळावे (गॅदरिंग्ज) आणि मोठय़ा सभांवर बंदी कायम राहणार आहे. विवाह किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 100 लोकांना अनुमती देण्यात आली आहे. अशा कार्यक्रमांना उपस्थित असणाऱयांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. अंत्यसंस्कारांसाठी जास्तीत जास्त 20 लोक उपस्थित राहू शकतील. त्यांनाही कोरोना नियमावलीचे कठोर पालन करावे लागेल. मंदिरे, मशिदी, चर्चेस, गुरुद्वारा आणि इतर धार्मिक स्थळे उघडण्यास आणि तेथे पूजाअर्चा किंवा इतर धार्मिक विधी करण्यास अनुमती असेल. तथापि, जत्रा, धार्मिक उत्सव, सण, मिरवणुका, आणि जनमेळावे (काँगेगेशन्स) यांच्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.









