बेंगळूर, मंगळूरनंतर बेळगावमध्ये सुविधा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधील विमान प्रवास करणाऱयांच्या संख्येसोबतच विमान फेऱयांचीही संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. स्टार एअरने नव्या शहरांना विमानसेवा सुरू करत आणखी एक विमान बेळगावमध्ये नाईट पार्किंगसाठी आणले आहे. यामुळे बेळगावमध्ये आता दोन विमाने नाईट पार्किंगसाठी दाखल होत आहेत. याचा फायदा प्रवाशांना होणार असून सकाळ व संध्याकाळची फेरी बेळगावला मिळणार आहे.
दोन वर्षांपूर्वी बेळगावमधील विमानांच्या फेऱयांअभावी विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु हळुहळु एक एक कंपनी या ठिकाणी दाखल झाली. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांना बेळगावमधून विमानसेवा सुरू करण्यात आली. बेळगावमधून आपल्या विमान व्यवसायाला गती देणाऱया स्टार एअरने आपले पहिले विमान पार्किंगसाठी बेळगावमध्ये आणले. 8 सप्टेंबर 2019 ला पहिले विमान दाखल झाले. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर 21 डिसेंबर 2020 ला स्टार एअरने दुसरे विमान नाईट पार्किंगसाठी बेळगाव विमानतळावर आणले.
स्टार एअरच्या ताफ्यात 50 आसन क्षमता असणारे एअरक्राफ्ट नुकतेच दाखल झाले. बेळगाव-सूरत-अजमेर, अजमेर-सूरत-बेळगाव तसेच बेळगाव-बेंगळूर या दोन सेवा मागील आठवडय़ापासून सुरू करण्यात आल्या. त्यामुळे हे एअरक्राफ्ट बेळगावमध्ये नाईट पार्किंगसाठी ठेवण्यात आले. नाईट पार्किंगमुळे बेळगाववरून सकाळची व संध्याकाळची फेरी प्रवाशांना उपलब्ध होत आहे.
बेंगळूर, मंगळूरनंतर आता बेळगावमध्ये पार्किंग
राज्यातील बेंगळूर व मंगळूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. या ठिकाणी नाईट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर नाईट पार्किंगची सुविधा असणारे बेळगाव हे तिसरे शहर ठरले आहे. स्टार एअरने आपल्या ताफ्यातील दोन विमानांचे या ठिकाणी पार्किंग सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात पार्किंगसाठी अन्य विमानेही दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









