शहरात पहिल्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत पोलीस यंत्रणा रस्त्यावर

प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने बुधवार दि. 21 एप्रिलपासून बेळगावसह कर्नाटकात रात्रीचा कर्फ्यू जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पहिल्याच दिवशी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. वाहतूक व शहर पोलीस रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर होते.
बेळगाव शहरातील प्रमुख मार्गांवर बरिकेड्स उभे करून रस्ते अडविण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी रात्री फिरणाऱया दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशी केली. अनावश्यक फिरण्यावर निर्बंध असतानाही रस्त्यावर फिरणाऱयांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. रात्री 9.30 नंतर शहरातील रस्ते, गल्ल्या निर्मनुष्य झाल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक सुरू होती. तसेच आवश्यक असणाऱया सुविधाही सुरू होत्या. रुग्णवाहिकांसह उपचारासाठी जाणाऱया नागरिकांना मुभा देण्यात येत होती. पोलीस आयुक्त के. त्यागराजन हे रात्री उशिरापर्यंत कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात व्यस्त होते.
कोरोना नियंत्रणासाठी भास्करराव यांची नियुक्ती
राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य पोलीस खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन व्हावे, यासाठी पोलीस मुख्यालयाकडून ज्येष्ठ अधिकाऱयांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्हय़ांसाठी आयपीएस अधिकारी भास्करराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.









