सध्या गरज नसल्याचे दिले स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील ‘नाईट कर्फ्यू’बाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही आणि 1 जानेवारीलाही तो करण्याचा विचार नाही, असा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. तसेच तो प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
इतर काही राज्यांच्या धर्तीवर गोव्यातही ‘नाईट कर्फ्यू’ लावण्याची मागणी करणारा प्रस्ताव आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सरकारला पाठवला होता. या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणी केल्याचेही राणे यांनी सांगितले होते. गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ‘नाईट कर्फ्यू’ लावण्याची सूचना राणे यांनी प्रस्तावातून केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी तशी सूचना करणारे पत्र पाठवले असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा आणि एसओपी कडक अंमलात आणा, असे त्यांनी पत्रातून बजावले असल्याची माहिती राणे यांनी दिली. गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने व पर्यटन कायम राहाण्याकरीता तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सावधानता बाळगावी, अशी विनंती राणे यांनी त्या प्रस्तावातून सरकारला केली आहे. सध्या तरी नाईट कर्फ्यू गोव्यात लावण्याची गरज नाही, असे सांगून राणे यांच्या प्रस्तावास डॉ. सावंत यांनी नकार दर्शवला आहे.









