कोरोना काळात सरावात सातत्याचा अभाव, वर्कआऊटकडे खेळाडूंचे दुर्लक्ष, केएसए लीगमध्ये दमछाक, दुखापती होण्याचा मोठा धोका
संग्राम काटकर/कोल्हापूर
जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध शिथील केल्याने केएसए लीग फुटबॉल स्पर्धेचा किकऑफ 22 फेब्रुवारीला करत असल्याचे जाहीर करत केएसएने हंगामाला सुरुवात केली आहे. असे असले तरी मात्र कोरोना काळात सातत्याने सरावात नसलेले 16 संघांमधील खेळाडूंचा केएसए लीग सामन्यात किती कस लागले हा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या महापौर चषक स्पर्धेच्या उपांत्य व अंतिम सामन्यात खेळाडूंची झालेली दमछाक साफ दिसली आहे. वॉल पासिंग व शुटींग खेळाडूंना करता आले नाही. मधल्या काळात संघ प्रशिक्षक खेळाडूंना वर्कआऊट व धावण्याच्या सरावात राहण्याचे सांगत होते. पण त्याकडे खेळाडूंनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता लीगमधील सामन्यांमध्ये सरावाअभावी खेळताना खेळाडूंना संघर्ष करावा लागेलच आहेच, शिवाय दुखापतीलाही सामोरे जावे लागण्याचा धोका आहे.
कोरोनामुळे तब्बल 23 महिने कोल्हापूरी फुटबॉल हंगाम स्थगित राहिला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेमुळे शासनाने मैदाने व व्यायामशाळा बंद ठेवल्याने सर्वच संघांमधील बहुतांश खेळाडूंना सराव करता आला नाही. मात्र या काळात सर्व संघांचे प्रशिक्षक खेळाडूंना घरीच वर्कआऊट करण्याचे आवाहन करत हेते. पण या आवाहनाला खेळाडूंनी मनावर न घेता वर्कआऊट करणे टाळले. दिवसामागून दिवस सरकू लागले. दुसरी लाट ओसल्यानंतर पुढील काहीच दिवसांनी भविष्यामध्ये कोरोनाची परिस्थिती कशी आहे, हे पाहून फुटबॉल स्पर्धा आयोजित करा, असे आवाहन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने केले होते. मात्र ऑक्टोबर 2021 मध्ये कोरोनाच्या तिसरी लाट आली. मात्र शासनाने काही नियम अटी घालून मैदाने सरावासाठी खुले ठेवण्यास परवानगी दिली. मात्र कोणत्याही वरिष्ठ संघाने खेळाडूंना सरावासाठी मैदानात बोलवले नाही. खेळाडूंनीही स्वयंस्फुर्तीने मैदानात जाण्याची तसदी घेतली नाही.
अशातच केएसएने कोरोनाचा संसर्ग कमी येईल हे गृहीत धरुन सन 2021-22 या फुटबॉल हंगामाचा किकऑप करण्यासाठी महिन्याभरापूर्वी संघ व खेळाडू नोंदणी करवून घेऊन केएसए लीग आयोजनासाठी छत्रपती शाहू स्टेडियम सर्व बाजूंनी तयार ठेवले होते. याच काळात केएसएचे पेट्रन-इन-चिफ श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही निर्बंध शिथिल झाल्यानंतर केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यास हरकत नाही, असे केएसए पदाधिकाऱयांना सांगितले होते. सुदैवान आठ दिवसांपूर्वी कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथील केल्याने महापालिकेने सन 2019-20 या फुटबॉल हंगामातील शिल्लक राहिलेला उपांत्य व अंतिम सामना शाहू स्टेडियमवर खेळला. या दोन्ही सामन्यात बलाढय़ दिलबहार तालीम मंडळ (अ), फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ व प्रॅक्टीस फुटबॉल क्लब (अ) या संघांमधील खेळाडूंची सरावाअभावी दमदार खेळ करता आला नाही. शिवाय त्यांना आक्रमक वाटावी, अशा चढाई करुन त्यात गोल करता आला तर नाही. इतकेच नव्हे तर 80 मिनिटांचा सामना खेळताना खेळाडूंची दमछाक झाल्याचे स्पष्ट दिसले. इतकेच नव्हे सामना पूर्ण क्षमतेने खेळण्यासाठी लागणारा स्टॅमिना खेळाडूंनी गमावला असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आता लवकरच सुरु होत असलेल्या केएसए लीगला दिलबहार, फुलेवाडी, प्रॅक्टीससह अन्य 13 संघही सरावाअभावी खेळाडू कशा पद्धतीने खेळतात हे आता विचार करायला लावणार आहे.
रोज अडीच तास सराव आवश्यकच…
एका सामन्यात पूर्ण क्षमतेने खेळण्यासाठी 11 किलो मीटर धावण्याचा सराव करणे आवश्यक आहे. शिवाय रोज जो खेळाडू अडीच तास बॉलवर खेळण्याचा सराव करतो तोच सामन्यात पूर्णक्षमतेने खेळू शकतो. पण आता कोरोनामुळे सरावासाठी बंद राहिलेली मैदाने आणि खेळाडूंनी वर्कआऊट करण्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने त्याच्या शरिराचे वजन वाढलेले आहे. या वाढलेल्या वजनाचा खेळाडूंच्या खेळावर नक्कीच परिणाम जाणवेल.
धनंजय सूर्यवंशी (प्रशिक्षक : दिलबहार ताली मंडळ फुटबॉल संघ)









