पंतप्रधानांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक
दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या सावटातून देश सावरत असतानाच आफ्रिकन देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढल्याने ब्रिटन, अमेरिकेसह सर्वच देशांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूचे सावट जगाला भेडसावत असतानाच अनेक देशांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. भारतातही शनिवारी पंतप्रधान मोदींनी या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. नवा व्हेरिएंट घातक असल्यामुळे पंतप्रधानांनी यावेळी उशीर होऊ नये यासाठी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, आरोग्य सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत देशाला जोरदार तडाखा बसला होता. हा संसर्ग सध्या आटोक्यात आला असतानाच नव्या विषाणूच्या धास्तीने जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिका, रशिया, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांनी आफ्रिकेतून येणाऱया विमानांवर बंदी घातली आहे. तसेच न्यूयॉर्कमध्ये हेल्थ इमर्जन्सी (आरोग्यविषयक आणीबाणी) लागू करण्यात आली आहे. जगभरातील शेअर मार्केटमध्ये तर या विषाणूने पडझड केलीच आहे. पण आता पुन्हा रस्ते ओस पडण्याची वेळ येऊ नये ही काळजी घ्यावी लागेल. आफ्रिकेत अवघ्या काही दिवसांपूर्वी दिवसाला 200 रुग्ण सापडत होते. ती संख्या एका आठवडय़ात दिवसाला 2 हजारावर पोहचल्याने जगाची चिंता वाढली आहे.
भारतानेही उचलली कठोर पावले
केंद्र सरकारने राज्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यांना दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना आणि इस्रायलमधून येणाऱया प्रवाशांची कसून तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. भारताने सर्व विमानतळांना हाँगकाँग, बोत्सवाना आणि इस्रायलमधून येणाऱया प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारचा बेफिकीरपणा करू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
आतापर्यंत किती रुग्ण सापडले?
या प्रकाराचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत सापडला. आतापर्यंत 77 लोकांना या प्रकाराची लागण झाली आहे. बोत्सवानामध्येही 4 जणांना या प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. चिंतेची बाब म्हणजे बोत्सवानामध्ये पूर्णपणे लसीकरण झालेले लोकही याला बळी पडले आहेत. हाँगकाँगमध्येही या नवीन प्रकाराची 2 प्रकरणे आढळून आली आहेत. सध्या दोन्ही रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
डब्ल्यूएचओकडून व्हेरिएंटचे ‘ओमिक्रॉन’ असे नामकारण
आफ्रिकन विषाणूने सध्या सगळय़ा जगाची चिंता वाढवली आहे. डब्ल्यूएचओने त्याला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’च्या यादीत टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचे नामकरण जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ असे केले आहे. यापूर्वी शास्त्रज्ञांनी त्याला बी.1.1.529 असे नाव दिले होते. सुरुवातीला अल्फा, मग बीटा, डेल्टा आणि आता ‘ओमिक्रॉन’… कोरोनाच्या नव्या विषाणूंची ही साखळी वाढतच चालली आहे. भारतात सध्या या कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूचा एकही रुग्ण सापडलेला नाही. पण मागच्या लाटेत आपल्याला जोरदार तडाखा बसला होता. हा नवा विषाणू डेल्टापेक्षाही भयानक मानला जात आहे.









