इंग्लंड खेळणार पाच सामन्यांची सीरिज : यंदाच्या वर्षातही टीम इंडियाचे भरगच्च वेळापत्रक
वृत्तसंस्था/ मुंबई
बीसीसीआयने मंगळवारी 2023-24 दरम्यान मायदेशात होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार एकूण 16 आंतरराष्ट्रीय सामने भारतीय संघ मार्च 2024 पर्यंत खेळणार आहे. वेळापत्रकातील सर्वात महत्त्वाची मालिका आहे ती भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका आहे. यावर्षी बीसीसीआय आयसीसी वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. वनडे विश्वचषकासोबत महत्वाच्या द्विपक्षीय मालिकांचेही यजमानपद बीसीसीआयकडे आहे. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका होईल. तर, वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान टी-20 मालिका होणार आहे.
अफगाणविरुद्ध मालिका झाल्यानंतर इंग्लंडचा संघ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येईल. या मालिकेला 25 जानेवारी रोजी हैदराबाद येथे सुरूवात होईल. त्यानंतर 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टण येथे दुसरी कसोटी खेळली जाईल. तिसरी कसोटी 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या दरम्यान राजकोट येथे पार पडेल. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी रांची येथे तिसऱ्या कसोटीला सुरुवात होईल. तर, अखेरची कसोटी 7 मार्च ते 11 मार्च रोजी धर्मशाला येथे खेळला जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची असेल. विशेष म्हणजे, इंग्लंडचा संघ भारतात 2011 नंतर एकही कसोटी मालिका जिंकला नाही. मात्र, आता इंग्लंड ज्याप्रकारे बॅझबॉल क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे ते यावेळी विजयाचा प्रयत्न करतील.
भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने
वनडे विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतात दाखल होणार आहे. उभय संघांतील पहिला वनडे सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना 24 सप्टेंबर रोजी इंदोरमध्ये, तर तिसरा वनडे सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये आयोजित केला गेला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ वनडे विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात करेल. उभय संघांतील या वनडे मालिकेमुळे भारतासह ऑस्ट्रेलियन संघाचीही विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर चांगली तयारी होईल. ऑस्ट्रेलियन संघाचा हा दौरा केवळ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर थांबणार नाही. विश्वचषक स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. दुसरा सामना 26 नोव्हेंबर रोजी त्रिवेंद्रममध्ये खेळला गेला. तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी, तर चौथा सामना 1 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये खेळला जाईल. मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये आयोजित केला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघाच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला वनडे सामना – सप्टेंबर 22 (मोहाली)
दुसरा वनडे सामना – सप्टेंबर 24 (इंदोर)
तिसरा वनडे सामना – सप्टेंबर 27 (राजकोट)
पहिला टी-20 सामना – 23 नोव्हेंबर (विशाखापट्टणम)
दुसरा टी-20 सामना – 26 नोव्हेंबर (त्रिवेंद्रम)
तिसरा टी-20 सामना – 28 नोव्हेंबर (गुवाहाटी)
चौथा टी-20 सामना – 1 डिसेंबर (नागपूर)
पाचवा टी-20 सामना – 3 डिसेंबर (हैदराबाद)
अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-20 सामने :
- पहिला टी-20 सामना – 11 जानेवारी 2024 (मोहाली)
- दुसरा टी-20 सामना – 14 जानेवारी 2024 (इंदोर),
- तिसरा टी-20 सामना – 17 जानेवारी 2024 (बेंगळूर)
इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका :
पहिली कसोटी – 25 ते 29 जानेवारी 2024 (हैदराबाद)
दुसरी कसोटी – 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2024 (विशाखापट्टणम)
तिसरी कसोटी – 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी (राजकोट)
चौथी कसोटी – 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2024 (रांची)
पाचवी कसोटी – 7 मार्च ते 11 मार्च 2024 (धरमशाला)









