मुंबईमध्ये गेल्या वषी 12 ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्यामागे परकीय शक्तीचा हात आहे असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले तेव्हा ते फारसे कोणाला पटले नसावे. एकतर मुंबईत विजेअभावी हाहाकार उडाला होता आणि सरकारकडून तातडीने दुसरे काहीही कारण सांगता येत नसल्याने हा मुद्दा पुढे केला असावा असाच बहुतेकांचा संशय होता. मात्र आता देशाच्या आर्थिक राजधानीला ठप्प करण्याचा हा चीनकडून झालेला प्रयत्न होता. भारताने सीमेवर फार संघर्ष करू नये यासाठी चीनने हा प्रयत्न केला होता असे अमेरिकेतील ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्त दिले आहे. त्यामागे ठोस अभ्यास आहे आणि चिनी सरकारच्या पाठिंब्याने चालणारी कंपनी त्यामागे होती असे दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. भारत आणि चीन सीमेवर गोळीबार सुरू असताना चीनने हे कृत्य केले. भारतातील वीज पुरवठा सुरळीत चालण्यासाठी ज्या सॉफ्टवेअर आणि सिस्टिमचा वापर केला जातो त्यात चिनी हॅकर्सनी मालवेअर इंजेक्ट केला. दहा ठिकाणी केलेल्या प्रयत्नानंतर तो एका ठिकाणी यशस्वी झाला. पण त्याचा फटका देशाच्या आर्थिक राजधानीला बसवणे हा हॅकर्सचा मुख्य उद्देश होता. हे एक प्रकारचे भारत विरोधी युद्धच होते. या घटनेला जवळपास पावणे पाच महिने उलटल्यानंतर हा खुलासा झाला आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने हल्ला झाला तेव्हाच तात्काळ हा मालवेअरच्या माध्यमातून केलेला सायबर हल्ला असल्याची शक्मयता वर्तवली होती. ठाणे जिह्यातील पडघा येथील लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे लोकल रेल्वेच्या सेवेपासून अनेक सेवांना फटका बसला होता. हा हल्ला पूर्ण क्षमतेने करण्यात आला नव्हता असेही स्पष्ट झाले आहे. चिनी सरकारच्या पाठबळाने सुरू असणाऱया रेड इको नावाच्या कंपनीने हा हल्ला केला होता आणि भारतातील अनेक ठिकाणच्या वीज पुरवठा आणि मागणीवर नियंत्रण ठेवणाऱया यंत्रणांवर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशी माहिती पुढे आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सुमारे महिनाभरापूर्वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काही निवडकांच्या हाती असणाऱया या डिजिटल युगाच्या सूत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त करून, भविष्यात असे सायबर हल्ले वाढून दुसऱया देशातील प्रभावी यंत्रणांची नियंत्रणे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न होईल असा इशारा देण्यात आला होता. येत्या दशकभरात काय होईल याचा अहवाल देणाऱया या फोरमने यापूर्वी प्रचंड साथीचा इशारा दिला होता आणि सार्स, इबोलाने अनेक देशांची घडी विस्कटली होती. गेले वर्ष सुरू होता होता आलेल्या कोरोनाने संपूर्ण जगावर परिणाम केला. लाखो लोकांचे बळी घेतले. कोटय़वधी लोकांना जर्जर करून सोडले. जगातील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था डळमळीत केली आणि अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही. आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शेजारच्या राष्ट्रांना ज्यांच्यापासून काही नैसर्गिक संपत्ती लुबाडता येणे शक्मय आहे अशा कमजोर राष्ट्रांना लुबाडण्याची जुनीच साम्राज्यवादी मानसिकता नव्या नव्या प्रकाराने पुढे येताना दिसत आहे. पूर्वीच्या काळात एखादा देश ताब्यात घेऊन तिथल्या लोकांना गुलाम बनवायचे आणि मग त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करत राज्य करायचे, त्यांच्या विरोधाला मोडून काढत नैसर्गिक संपत्तीची लूट करायची आणि त्याच राष्ट्रांना आपली जुलमाची बाजारपेठ बनवायची असा उद्योग वर्षानुवर्षे सुरू होता. जगाच्या नकाशात बदल होत नवी राष्ट्रे उभी राहिली. त्यातून कुठे लोकशाही तर कुठे हुकूमशाही जन्माला आली. काही ठिकाणी महासत्तांचे बाहुले राष्ट्रांचे प्रमुख म्हणून सत्तेवर आले. काही ठिकाणी धर्मगुरूंना सिंहासनावर बसवण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या कट्टरतावादाची कटू फळे त्यांना खुर्चीवर बसवणाऱया महासत्तांनाच चाखावी लागली. जगातील प्रत्येकाला जगण्याचा आणि आपला उद्धार करण्याचा अधिकार आहे. या मूलभूत विचाराला मूठमाती देणारे महाठग राज्यकर्ते होऊ लागले. चीन हा त्यापैकीच एक. खोटय़ा प्रचार तंत्राच्या साह्याने स्वकियांचाही काटा काढण्यात वाकबगार असणाऱया चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने माओ यांच्या प्रचारतंत्राने आतापर्यंत वाटचाल केली आहे. आपल्या प्रगतीचा ढोल बनवायचा आणि आसपासच्या राष्ट्रांवर त्याचा परिणाम होईल अशी स्थिती निर्माण करायची, काही ना काही निमित्ताने त्यांना पंखाखाली घ्यायचे आणि नंतर मुस्कटदाबी सुरू करायची ही चीनची नीती आहे. शेजारी राष्ट्रांच्या भूभागावर ताबा मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न उघडपणे दिसत आहेत. पाकिस्तानमधील बंदरापर्यंत महामार्ग असो किंवा वन बेल्ट वन रोड किंवा युरोपपर्यंत जाणारा सिल्क रोड असो या सर्वात गुंतवणूक करणारा चीन आसपासच्या राष्ट्रांवर प्रभाव वाढवणे आणि आपल्या मार्गात अडथळा ठरणाऱयांना हटवण्यासाठी शक्ती वापरणे यासाठी कुप्रसिद्ध आहे. चीनच्या चुकीच्या व्यवहारामुळे त्याची जगातील अनेक राष्ट्रांजवळची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्याला जवळच्या राष्ट्रांवर ताबा हवा आहे. भारताने प्रगतीच्या समान संधीच्या तत्त्वावर चीनशी बोलणी केली मात्र माओचे वारसदार जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच नरेंद्र मोदींनाही फसवून गेले आहेत. याचा अर्थ चीनचा पीळ बदललेला नाही. भारत आपल्या विस्ताराच्या उद्देशाला धोका ठरत आहे म्हटल्यानंतर त्याविरोधात कुरापती काढणे चीनने सुरू केले आहे. सायबर हल्ला हा त्याच्या पुढचा टप्पा होता. जगातील शक्तीवान राष्ट्रांची एकजूट होऊन चीनला धडा शिकवला जात नाही तोपर्यंत त्याला अद्दल घडणार नाही. हाँगकाँगच्या बाबतीत केलेला करार 2047 पर्यंत पाळण्याचे नैतिक कर्तव्यही न पाळता 27 वर्षे आधीच त्याचा विशेष दर्जा काढून घेणारे चिनी सरकार शेजारी राष्ट्रांची कधीच प्रगती होताना पाहू शकणार नाही. हे शेजारच्या सर्व राष्ट्रांनी जाणले पाहिजे. केवळ भारताने नव्हे तर संपूर्ण जगाने त्याच्या या दुसऱया हल्ल्यावर गांभीर्याने चिंता करण्याची वेळ आली आहे.
Previous Articleभारतातून होणाऱया कार निर्यातीत घट
Next Article स्मार्टफोन व्यवसायामधून माघार नाही-एलजीचे स्पष्टीकरण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








