दिवसभरात 1 लाख 32 हजार नवे रुग्ण- सक्रिय रुग्णसंख्या 10 लाखांसमीप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंद करत गेल्या 24 तासात देशात जवळपास 1 लाख 32 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवार सकाळपर्यंतच्या 24 तासांत देशात 1 लाख 31 हजार 968 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 780 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान दिवसभरात 61 हजार 899 जण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्याच्या घडीला 9 लाख 79 हजार 608 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात आतापर्यंत 1 लाख 67 हजार 642 बळी गेले असून त्यात महाराष्ट्रातील मृतांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोना रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडण्याची देशात गेल्या चार दिवसातील ही चौथी वेळ आहे. नव्या रुग्णवाढीमुळे देशातील एकूण बाधित रुग्णसंख्या 1 कोटी 30 लाख 60 हजार 542 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 13 हजार 292 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.









