प्रकल्पग्रस्त, शेतकऱयांच्या अनेक समस्या
वार्ताहर / दोडामार्ग:
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंतापदी रोहित कोरे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त तसेच कालवे परिसरातील शेतकरी-ग्रामस्थ यांच्या प्रलंबित मागण्यांना पुन्हा एकदा धार आली आहे. उजवा व डावा कालवा गेलेल्या परिसरातील शेती-बागायतीमधील अडचणी विस्थापितासमोरील पाण्याची समस्या आदी सोडविण्याकडे नवीन कार्यकारी अभियंता नेमकी काय पाऊले उचलतात, याकडे प्रकल्पग्रस्त शेतकऱयांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा मिळून साकारलेला तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प जरी पूर्ण झाला असला तरी या प्रकल्पाशी निगडित अन्य बरीच कामे प्रलंबित आहेत. तर आणखी नवनवीन कामे उभी राहत आहेत. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात खानयाळे येथे डावा कालवा फुटला व त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी, ग्रामस्थ यांच्या शेती बागायतीची अतोनात हानी झाली. हा कालवा फुटला आणि उजवा, डावा या दोन प्रमुख कालव्यांसोबत अन्य पोटकालवे व मुख्य धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चिला गेला आहे. या नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ यांना शासनाकडून अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नाही. या प्रकल्पाशी निगडित ज्यांना विस्थापित करण्यात आले, त्यांना पर्यायी शेतजमिनी दिल्या. पण, मुबलक पाणी पुरवठय़ाची सोय अद्याप करून दिली नाही. दोन राज्यांचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या प्रकल्पाशी निगडित संबधित शासकीय कार्यालये अन्यत्र हलविण्यात आली ती पुनःश्च सक्षम अधिकाऱयांसह येथे आणण्याची मागणी अद्यापपर्यंत चालूच आहे.
नवीन कार्यकारी अभियंत्यांसमोर मोठी जबाबदारी
कोनाळकट्टा, आवाडे, घोटगे, परमे, साटेली-भेडशी या भागातील नदी पात्रातील गाळ काढणे, कालव्याच्या शेजारून असलेले रस्ते खडीकरणाद्वारे उपयोगात आणणे, अनेक ठिकाणच्या कॉजवेची उंची वाढवणे, धरण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा, रॉक गार्डन तसेच यू पॉईंटची, विश्रामगृह यांची दुरुस्ती-देखभाल, आदींसह अन्य बरीच कामे प्रलंबित असून या प्रकल्पाचे नवनियुक्त कार्यकारी अभियंता नेमकी काय कार्यवाही करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक तथा मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी अलिकडेच कोरे यांची भेट घेऊन त्यांचे या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.









