प्रतिनिधी/ बेळगाव
नूतन पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन हे सोमवारी सकाळी पदभार स्वीकारणार आहेत. रविवारी ते बेळगावात दाखल झाले आहेत. यापूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी बेळगाव जिल्हय़ात सेवा बजावली आहे.
के. त्यागराजन हे 2006 बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या सीआयडी आर्थिक गुन्हे तपास विभागात सेवा बजावत होते. बेळगावचे पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांची बेंगळूर येथील अंतर्गत सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त पदावर त्यागराजन यांची नियुक्ती झाली आहे.
सध्या पोलीस दलात मोठय़ा प्रमाणात गटबाजी निर्माण झाली आहे. या गटबाजीवर मात करून बेळगाव पोलीस दलाला दिशा देण्याचे काम नव्या पोलीस आयुक्तांना करावे लागणार आहे. मटका, जुगार माफियांबरोबरच अंमली पदार्थांची तस्करी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच सुपारी गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. त्यामुळे साहजिकच बेळगावात सर्व काही ठिकठाक आहे, असे नाही.
बी. एस. लोकेशकुमार हे आपल्या कार्यकाळातील बहुतेक वेळ त्यांनी कार्यालयातच घालविला. कोरोना लॉकडाऊनच्या काळात बेळगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी आपला वेगळा असा ठसा उमटविण्यात मावळते आयुक्त कमी पडले. त्यामुळेच गुन्हेगारीचा आलेख वाढला असून गुन्हेगारी संपविण्याबरोबरच पोलीस दलातील गटबाजी संपविण्याची जबाबदारीही नव्या पोलीस आयुक्तांवर आहे.









