निरंजनसिंह सरदेसाई यांचे प्रतिपादन, मराठा मंडळ महाविद्यालयाचा एनसीसी सप्ताह साजरा
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयातील मराठा मंडळ संचलित पदवी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्यावतीने एनसीसी सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे आयोजन व मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. आय. एम. गुरव यांनी केले.
या सप्ताहाची सुरुवात वनमहोत्सवाने करण्यात आली. महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. एम मुल्ला, प्रा. पांडुरंग भातकांडे, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. आय. एम. गुरव व महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
यावेळी एनसीसी कॅड्टेसनी खानापूर शहरातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याकरिता स्वच्छ भारत अभियान या मोहिमेची जागृती फेरी काढली. या जागृती फेरीची सुरुवात देसाई गल्लीपासून होऊन मलप्रभा नदीघाटावर सांगता झाली. त्यानंतर एनसीसी कॅडेट्सनी नदीघाटावर स्वच्छता अभियान राबविले व संपूर्ण मलप्रभा नदीघाट स्वच्छ केला. यानंतर या स्वच्छ भारत अभियानात सहभागी कॅडेट व उपस्थितांना संबोधन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इन्फोसिसचे विद्यमान डेव्हलपमेंट कन्सल्टंट निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई उपस्थित होते.
यावेळी सरदेसाई म्हणाले, एनसीसी स्थापनेचे उद्दीष्टच मुळी नव्या पिढीमध्ये चारित्र्यसंपन्न, साहसी, सांघिक भावना व निरपेक्षता या गुणांची वृद्धी करत तरुण पिढी निर्माण व्हावी हे असल्याने आजघडीला एनसीसीचे महत्त्व देशात वाढले आहे. शिवाय व्यसनाधीनतेपासून आजच्या तरुणाईने कसे दूर राहिले पाहिजे, याचा आपल्या विचारातून सल्ला दिला. स्त्री सबलीकरण आणि समता यावर भाष्य करत महिला कॅडेटचा गौरव केला. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर एनसीसी कॅडेट्सनी खानापूर येथील शासन प्रमाणित अनाथ वसतिगृहाला भेट दिली. व तेथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बेळगाव जिल्हा बाल संरक्षण खात्याचे अधिकारी जे. टी. लोकेशअप्पा, मुख्याध्यापक शशिकांत जनावडे, पांडुरंग तळकटनार उपस्थित होते. यावेळी लोकेशअप्पा यांनी एनसीसी विद्यार्थ्यांना उद्देशून समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. तर लेफ्टनंट डॉ. आय. एम. गुरव यांनी अनाथ, वंचित मुलांचे जीवनविश्व एनसीसी कॅडेटना उलगडून सांगितले.
सूत्रसंचालन पांडुरंग तळकटनार यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक सिनिअर अंडर ऑफिसर सोमनाथ ठोंबरे यांनी केले. यावेळी कल्लाप्पा पाटील, शितल हुंदरे, माधुरी गुरव, भाग्यश्री शास्त्री, मिलन गुरव, अंजली चौगुले, सुरज बिरसे आदी कॅडेट्सनी मनोगते व्यक्त केली. आभार विनायक टक्केकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता एनसीसी गीताने झाली.









