वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियात मंगळवारी कोरोनाचे आणखी तीन नवे रूग्ण आढळल्याने 8 फेब्रुवारीपासून येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेवर पुन्हा चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.
गेल्या आठवडय़ामध्ये या स्पर्धेसाठी विविध देशांच्या टेनिसपटूंचे तसेच प्रशिक्षक वर्गाचे मेलबोर्नमध्ये चार्टर विमानाने आगमन झाले. सुमारे 1000 लोकांचे येथे आगमन झाल्यानंतर त्यामधील 7 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत आढळून आले. मंगळवारी आणखी तीन कोराना बाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी दोन टेनिसपटू असल्याचे व्हिक्टोरिया शासनाच्या आरोग्य विभागाने सांगितले. या स्पर्धेत दाखल होणाऱया विविध देशांच्या सर्व टेनिसपटूंना तसेच त्यांच्या प्रशिक्षक वर्गाला विविध हॉटेल्समध्ये 14 दिवसांच्या कालावधीकरिता क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या टेनिसपटूपैकी बऱयाच जणांनी कोणतीही तक्रार न करता आयसोलेशनची सक्ती मान्य केली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. सर्बियाचा जोकोव्हिक, जपानच्या ओसाका, अमेरिकेची सेरेना विलीयम्स आणि स्पेनच्या नदाल यांना ऍडलेडला हवाई प्रवास करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.









