दोघे मोटारसायकलस्वार गंभीर जखमी, कारला ओव्हरटेक करून जात असताना टक्कर
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
राष्ट्रीय महामार्गावर नव्याबांद-कुंकळळी येथे बस व मोटारसायकल यांच्यात रविवारी सकाळी झालेल्या अपघातात मोटारसायकलचालक शुभकरन दास (वय वर्षे 20) व मागे बसलेला राकेश दास (25) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना आधी बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले व नंतर गंभीर दुखापत झाल्याने मडगावातील इस्पितळामध्ये पाठवण्यात आले. तेथून त्यांना बांबोळीतील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
हा अपघात सकाळी 8.15 वा. नव्याबांद-कुंकळ्ळी येथील धोकादायक वळणावर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समोरासमोर टक्कर झाल्याने मोटारसायकलचालक व मागे बसलेला अन्य इसम हे गंभीर जखमी झाले. सदर प्रवासी वाहतूक करणारी बस काणकोणहून मडगावला निघाली होती, तर पल्सर मोटारसायकल मडगावहून काणकोणच्या दिशेने येत होती. नव्याबांद येथील धोकादायक वळणावर स्विफ्ट कारला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात समोरून आलेली बस व दुचाकी यांच्यात टक्कर झाली. त्यासरशी मोटारसायकल बसखाली अडकली व चालक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर आडवा पडला, तर मागे बसलेला इसम बसच्या मागे जाऊन पडला.
गंभीर जखमी झालेले शुभकरन दास व राकेश दास हे दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे असून ते वेर्णा येथे कुटुंबियांसह राहत आहेत. दोघेही वेर्णा येथून मुरडेश्वर येथे निघाले होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी नंतर पोलिसांना दिली. कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक सुरेश वेळीप यांनी पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक टेरीन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढील तपास करत आहेत.









