कोरोना संसर्गापासून बचावासाठी अवलंबलेल्या लॉकडाऊनचा काळ आता संपत चालला असून लवकरच सर्वच निर्बंध हटणार आहेत. त्यामुळे आता दीर्घकाळापासून बंद असलेल्या जिम अर्थात व्यायामशाळा सुरु होणार आहेत. व्यायामप्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असली तरी आता जिममध्ये जाताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.
विषाणूचा प्रसार हा दमट
जागांमध्ये अधिक वेगाने होतो.
जिममध्ये बहुतेकदा वातावरण दमट असते. त्यामुळे तेथे जाताना अधिकाधिक दक्ष राहावे. नैसर्गिकरित्या वायुविजन होण्याची सोयदेखील असायला हवी. जेणेकरून जिमच्या आतील दमटपणा कमी होऊ शकेल.
जिममध्ये एकावेळी अनेक जण येतात. साहजिकच, तेथील साधनेही अनेक जण हाताळतात. आपण ती हाताळून झाल्यानंतर तेच हात घाम पुसण्यासाठी वापरणे टाळावे.
व्यायाम मार्गदर्शक आणि तेथील कर्मचारी यांनी जिम सुरू होण्यापूर्वी सर्व व्यायामसाधने, मशीन यांचे सॅनिटायजेशन केले आहे ना याची खात्री करुन घ्यावी. तसेच काही वेळाच्या अंतराने मशीन पुन्हा सॅनिटाईज करावे.
व्यायाम मार्गदर्शकांशी बोलून जिमला जाण्याची एक निश्चित वेळ ठरवून घ्या. त्याच वेळी जाऊन व्यायाम करा. फार गर्दी होणारी वेळ न निवडल्यास उत्तम.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत शारीरिक अंतर ही फार महत्त्वाची असलेली गोष्ट असून ती जिममध्येही पाळावी. मागील काळात गटाने किंवा जोडीने व्यायाम करीत असला तरीही सध्या ते टाळलेलेच बरे. प्रत्येकामध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर जरूर राखावे.
जिममध्ये व्यायाम करताना तोंडाला खूप घट्ट मास्क घालू नये. साध्या सुती कापडाचा मास्क घालू शकतो. घामाने मास्क ओला झाल्यास मास्क बदला. मास्क तोंडाला लावण्यापुर्वी हात सॅनिटाईज करावेत.
जिममध्ये शक्य असल्यास
हातमोजे घालून व्यायाम करावा. ङजिमला जाताना स्वतःकडे सॅनिटायझर, टॉवेल किंवा वेट टिश्यू देखील घेऊन जावे. व्यायाम करताना घाम येतो तेव्हा आपल्या टॉवेलनेच तो पुसावा आणि वापरलेला टॉवेल बॅगमध्ये ठेवावा. कितीही जवळचा किंवा लांबचा मित्र असो एकमेकांचे टॉवेल वापरू नयेत.
कोणत्याही स्थितीत हात सॅनिटाईज न करता चेहरा, नाक, डोळे, तोंड यांना स्पर्श करू नका. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
जिममध्ये जाताना स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन जा. वैयक्तिक काळजी घेण्याच्या दृष्टीने अन्यत्र पाणी पिणे टाळा.
स्वतःचे योगा मॅट वापरा.
जिममधून घरी परतल्यावर थेट अंघोळीला जावे. जिमचे कपडे, वापरलेला टॉवेल आणि मास्क सर्व गोष्टी धुवून टाकाव्यात.
एखाद्या दिवशी अस्वस्थ वाटत असेल तर व्यायामाला सुट्टीच घ्यावी, आरामच करावा. जिममध्ये व्यायाम करत असताना आजूबाजूची एखादी व्यक्ती शिंकल्यास अथवा खोकल्यास किंवा तसे वारंवार घडल्यास सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरी गेल्यानंतर वाफ घ्यावी. तसेच शक्य असल्यास दररोज जलनेती करावे.