वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 वर आयोजित परिषदेत शनिवारी भाग घेतला आहे. नवे शिक्षण धोरण एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी दृष्टीकोन निश्चित करते. याचे लक्ष्य 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करणे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उद्देश 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने आमच्या शिक्षण व्यवस्थेला पुनर्जीवित करणे असल्याचे कोविंद यांनी उद्गार काढले आहेत.
नवे शिक्षण धोरण विद्यार्थ्यांदरम्यान तणाव निर्माण करणारी गुण किंवा ग्रेड्ससाठी घोकंपट्टी करण्याची सवय संपुष्टात आणणार आहे. नवे शिक्षण धोरण क्रिटिकल थिकिंग आणि संशोधनाच्या भावनेला प्रोत्साहन देईल. धोरणाकरता दोन लाखांहून अधिक सूचनांचा विचार करण्यात आला आहे. याचमुळे हे धोरण शैक्षणिक व्यवस्थेची आव्हाने, आकांक्षा आणि उपाययोजनांची वस्तुस्थिती दर्शवित असल्यचे राष्ट्रपतींनी ‘इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020: हायर एज्युकेशन कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले आहे.
केंद्राची भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगांच्या माध्यमातून मापदंड निश्चित करण्यापुरती मर्यादित असू नये. राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताला न्यायसंगत आणि ज्ञानआधारित समाज करण्यासाठीचा निरंतर प्रयत्न आहे. हा एक भारतकेंद्रीत शिक्षण प्रणाली लागू करतो, जो भारताला महासत्तेत बदलण्यासाठी थेट योगदान देणार असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.









