अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागलेले वर्ष 2020 हे आज मागे पडले आहे. नवे 2021 हे वर्ष नव्या आशा, आकांक्षा आणि ऊर्जांना घेऊन येईल तसेच मावळत्या वर्षातील संकटांचे मळभ या वर्षात दूर होऊन प्रगतीच्या निरभ्र आकाशाचे दर्शन होईल, अशी साऱयांचीच अपेक्षा आहे. सरत्या वर्षाचा बव्हंशी कालावधी कोरोना नामक अज्ञात विषाणूचा प्रतिकार करण्यात गेला. या विषाणूचे थैमान केवळ भारतात नव्हे, तर जगात सर्वत्र होते. आर्थिकदृष्टय़ा संपन्न आणि सामर्थ्यवान समजल्या जाणाऱया देशांमध्ये तर ते गरीब आणि दुर्बल देशांपेक्षा जास्त भयावह प्रमाणात होते व आजही आहे. भारतापुरते बोलायचे तर सरत्या वर्षाचे एप्रिलपासून सप्टेंबर हे सहा महिने कोरोनाने झाकोळून टाकले होते. तथापि, अखेरच्या तीन महिन्यांमध्ये आशेचे किरण दिसू लागले. सध्या कोरोना नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत असून नव्या दैनंदिन रूग्णांची संख्या आणि उपचाराधीन रूग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. सणासुदीच्या काळातही रूग्णसंख्या हाताबाहेर गेली नाही. या नूतन वर्षातही हाच कल पुढे सुरू राहो आणि कोरोनाचा निःपात होवो, अशीच साऱयांची इच्छा आहे हे निश्चित. याच संबंधातील दुसरी समाधानकारक बाब अशी की आता या विषाणूवर लस उपलब्ध झाली असून लवकरच देशव्यापी लसीकरण कार्यक्रम हाती घेतला जाईल. सारा देश या लसीकरण प्रक्रियेची आतुरतेने आणि उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहे. नववर्षाच्या प्रथम मासातच लसीकरणाला वेग येऊन कोरोनामुळे निर्माण झालेला भयगंड नाहीसा होईल आणि लोक खऱया अर्थाने ‘मोकळा श्वास’ नव्या वर्षारंभापासून घेऊ लागतील अशी आशा आहे. मावळत्या वर्षात केवळ या विषाणूचे आव्हान नव्हते. तर त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन निर्माण झालेली परिस्थिती अधिक गंभीर होती. उद्योगधंदे व व्यवसाय मंदावल्याने विविध शहरांमध्ये कामासाठी आलेल्या स्थलांतरितांची त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी जीवाच्या आकांताने चाललेली धडपड गेल्या वर्षाने अनुभवली. नकारात्मक विकासदर, बेरोजगारीतील मोठी वाढ आणि या दुष्टचक्रातून सुटका होणार तरी केव्हा, ही चिंता, यातच गेल्या वर्षाचा उत्तरार्ध संपून गेला. तथापि, दुष्काळाने भेगाळलेल्या रखरखीत भूमीत हिरवी पाती उगवावीत तशी काही आशास्थाने नूतन वर्षाचे वेध लागल्यापासूनच दिसू लागली आहेत. कोरोनावरील नियंत्रणासह अर्थव्यवस्थेवर दाटून आलेले मंदीचे कृष्णमेघही हटतील अशी सुचिन्हे दिसत आहेत. संकटे जशी समूहाने येतात, तशी ती समूहाने हटतात याचा अनुभव आता येत आहे. नकारात्मक विकासदराला सकारात्मकतेचे घुमारे फुटू लागले असून बेरोजगारीही कमी होताना दिसते. औद्योगिक उत्पादनात आशादायक वाढ होत असून बाजारपेठांमध्ये ग्राहकांची येजा वाढल्याचे पहावयास मिळते. साहजिकच मागणीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेची चाके हळूहळू का असेना पण विकासाच्या दिशेने फिरू लागल्याचा अनुभव येत आहे. वस्तू-सेवा करातून मिळणारे उत्पन्न गेल्या दोन महिने सलग एक लाख कोटींहून अधिक झाल्याचे दिसले. हाच कल नववर्षाच्या पूर्वार्धात राहिल्यास अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने प्रथम सावरेल आणि नंतर गतिमान होईल अशी अनुमाने अनेक सर्वेक्षण संस्थांनी व्यक्त केली आहेत. ही सर्व अनुमाने सत्य सिद्ध व्हावीत हीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. तेव्हा, गतवर्षाच्या अंतिम टप्प्यात निर्माण झालेले हे सकारात्मक वातावरण नव्या वर्षात आणि त्यानंतरही असेच रहावे आणि उत्तरोत्तर अधिक सुदृढ होत जावे असे सर्वांनाच वाटते. तथापि, केवळ असे ‘वाटून’ तसे होणार नाही. त्यासाठी सरकारपासून जनतेपर्यंत,उद्योजक-व्यापाऱयांपासून ग्राहकांर्पंत, श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत आणि दात्यांपासून घेत्यांपर्यंत साऱयांनाच आपापल्या प्रयत्नांचा वाटा उचलावा लागणार आहे. क्षुद्र राजकीय मतभेद आणि अवास्तव वैचारिक संघर्षांचे स्तोम न माजवता, देश प्रगतीपथावर असा वेगाने अग्रेसर होईल, हेच प्रत्येकाने पहावयास हवे. आपल्यासमोरील आव्हाने केवळ देशांतर्गत नाहीत. दुर्दैवाने आपल्याला लाभलेल्या शेजारी देशांपैकी कमीत कमी दोन आपल्या पूर्वीपासून वाईटावर आहेत. सध्या या दोन्ही देशांचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. मावळलेल्या वर्षाने या दोन्ही देशांनी आपली कोंडी करण्याचा पेलेला प्रयत्न पाहिला. नूतन वर्षाच्या आणि त्यानंतरच्या वर्षांच्याही ललाटी असे काही पाहण्याचे दुर्भाग्य असू नये, हे सुनिश्चित करण्याचे उत्तरदायित्व आपणा सर्वांचे आहे. कोणत्याही धोक्यापासून देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य आपल्या सेनादलांच्या आणि सुरक्षा दलांच्या मनगटात आहेच. ते त्यांनी अनेकदा दाखवून दिलेले आहे. मात्र हे सामर्थ्य वर्धिष्णू ठेवण्याचे कार्य देशवासियांना करायचे आहे. सैनिकी शक्ती अपराजित ठेवण्यासाठी अर्थव्यवस्था बळकट हवी. ती तशी शक्तीवान करण्यासाठी कार्यरत राहणे आपल्याच हाती आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य आपल्या राष्ट्राशीच जोडलेले असल्याने देशासमोरचे आव्हान हे आपल्यासमोरचेच आव्हान आहे या भावनेने कामाला लागणे आवश्यक आहे. योग्य आणि सातत्यपूर्ण आर्थिक धोरण, त्या धोरणाचे एकोप्याने क्रियान्वयन आणि या धोरणाचे लाभ मिळेपर्यंत ठेवलेले प्रयत्न सातत्य, ही सारीच प्रक्रिया प्रदीर्घकाळ पर्यंत नेटाने आचरणात आणण्याची आज कधी नव्हे इतकी आवश्यकता आहे. सरलेल्या वर्षात निर्माण झालेली आव्हाने काही प्रमाणात हटलेली असली तरी मिटलेली नाहीत. त्यामुळे विश्रांती आणि ढिलाईला संधी नाही. आरोग्य विषयक नियमांचे कसोशीने पालन करून कोरोना किंवा तत्सम रोगांना दूर ठेवणे आणि एकत्रितरित्या प्रयत्न करून अर्थव्यवस्था सुदृढ कारणे ही दोन आव्हाने या नूतन वर्षातही स्वीकारावी लागणारच आहेत. केवळ नूतन वर्षातच नव्हे, तर त्याही पुढच्या वर्षांमध्ये त्यांचा पाठपुरावा करावा लागणार आहे. तेव्हा, आळस आणि नकारात्मकता झटकून नूतन वर्षात आपल्या दैनंदिन कर्तव्यांप्रमाणे राष्ट्राप्रती असणारे उत्तरदायित्वही निष्ठेने पार पाडण्याचा निर्धार करूया.
Previous Article‘या’ देशाची डोकेदुखी वाढली; आढळला नव्या स्ट्रेनचा रुग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








