महाराष्ट्रात सर्वात कमी रिकव्हरी रेट : आंध्रप्रदेशात सर्वाधिक
देशात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 1.25 लाखांपेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. तर 3,867 बाधितांना जीव गमवावा लागला आहे. परंतु या सर्व घडामोडींदरम्यान देशातील रिकव्हरी रेट सातत्याने वाढत आहे.
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
30 एप्रिलपर्यंत देशातील कोरोना बाधितांचा रिकव्हरी रेट 25 टक्क्यांपेक्षा कमी होता, जो 23 मे पर्यंत वाढून 41 टक्क्यांपेक्षाही अधिक झाला आहे. 23 मेपर्यंत देशात 69 हजार 597 ऍक्टीव्ह रुग्ण होते. तर 51 हजार 783 रुग्णांनी संसर्गावर मात करत डिस्चार्ज मिळविला आहे.
नवे धोरण कारणीभूत
आरोग्य मंत्रालयाने 8 मे रोजी कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यासंबंधी नवे धोरण जाहीर केले होते. यात केवळ गंभीर रुग्णांचीच डिस्चार्जपूर्वी चाचणी करणे अनिवार्य ठरविण्यात आले आहे. लक्षणांशिवाय किंवा सौम्य लक्षणे दिसून येणाऱया रुग्णांना 10 दिवसांत चाचणीशिवाय डिस्चार्ज केले जाऊ शकते. परंतु संबंधित रुग्णाला सलग 3 दिवसांपर्यंत ताप आलेला नसावा. अशा रुग्णांना डिस्चार्जनंतरही 7 दिवसांपर्यंत होम आयसोलेशनमध्ये राहणे अनिवार्य ठरविण्यात आले आहे.
तर किंचित गंभीर रुग्णांना 10 दिवसांनंतरही ज्वर नाहीसा होऊन 3 दिवस झालेले असावेत आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल विनासहाय्य स्थिर असावी. लक्षणरहित, कमी गंभीर आणि किंचित गंभीर रुग्णांना डिस्चार्जपूर्वी कोरोनाच्या तपासणीसाठी होणारी आरटी-पीसीआर चाचणी करवून घेणे गरजेची नसल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
28 ते 65 टक्के
कोरोनाने सर्वाधिक बाधित 10 राज्यांमध्ये रिकव्हरी रेटही सुधारू लागला आहे. या 10 राज्यांमध्ये रिकव्हरी रेट 28 टक्क्यांपासून 65 टक्क्यांपर्यंत आहे. सर्वात कमी 28 टक्के रिकव्हरी रेट महाराष्ट्रात आहे. तेथे 23 मेपर्यंत 44 हजार 582 रुग्ण सापडले असून यातील 12 हजार 583 जणांनी कोरोनावर मात केली ओ. तर सर्वाधिक 65 टक्के रिकव्हरी रेट आंध्रप्रदेशात आहे. तेथे 2 हजार 667 रुग्ण सापडले असून यातील 1 हजार 731 जण संसर्गातून बरे झाले आहेत.
69 रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाच्या 69 टक्के रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे नाहीत. देशात लक्षणे दिसून न येणारे रुग्णच सर्वाधिक आढळून येत आहेत. याच कारणामुळे सरकारने अशा रुग्णांना 10 दिवसांत डिस्चार्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारचे रुग्ण डिस्चार्ज मिळाल्यावर संसर्ग फैलावत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वीची स्थिती…
यापूर्वी चाचणी निगेटिव्ह आल्यावरही रुग्णाला 14 दिवसांपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीत राहिल्यावरच डिस्चार्ज मिळत होता. रुग्णांना डिस्चार्जपूर्वी कोरोना चाचणी करविणे अनिवार्य होते. यापूर्वी सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी एकाचप्रकारे नियम लागू करण्यात आले होते.









