प्रतिनिधी / सांगली
जिल्हय़ात रविवारी नवीन आठ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले. तर ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या आता २९४ झाली. उपचारातील रूग्णसंख्या १०२ आहे. यातील पाच रूग्णांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.
वशी, शिराळा, तिसंगी, मौजे डिग्रज, पुजारवाडी येथे रूग्ण वाढले
वाळवा तालुक्यातील वशी येथील तीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये ४९ वर्षाची महिला, २९ वर्षाची व्यक्ती आणि २४ वर्षाची महिला यांचा समावेश आहे. मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील दोन व्यक्ती बाधित आहेत. त्यामध्ये ३६ वर्षीय व्यक्ती आणि १५ वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे. तर शिराळा येथील ५३ वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील २७ वर्षीय व्यक्ती, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी येथील ५३ वर्षीय व्यक्ती या सर्वांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
११ जण कोरोनामुक्त
जिल्हय़ातील ११ जणांचे उपचारानंतरचे स्वॅब निगेटिव्ह आल्याने जिल्हय़ाला दिलासा मिळाला आहे. हे ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील ६० वर्षीय व्यक्ती, विटा-हनुमंतनगर येथील ३४ वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील पाच व्यक्ती त्यामध्ये ६५ वर्षीय व्यक्ती, ९० वर्षाची महिला, ५० वर्षाची व्यक्ती, ७६ वर्षाची महिला, आणि १६ वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे. विटा येथील ११ वर्षाचा मुलगा तर वाळवा तालुक्यातील येलूर येथील २६ वर्षीय महिला असे ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आता संस्था क्वारंटाईन केले जाणार आहे.
प्रकृती चिंताजनक असणारे दोघे कोरोनामुक्त
रविवारी कोरोनामुक्त झालेल्यामध्ये चिंताजनक प्रकृती असणारे खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील ६० वर्षीय व्यक्ती आणि विटा-हनुमंतनगर येथील ३४ वर्षीय व्यक्ती या दोघांचेही उपचारानंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पण त्यांना इतर आजार असल्याने त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात इतर आजाराचे उपचार सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.
अतिदक्षता विभागात पाच जणांवर उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱ्या रूग्णांपैकी कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षीय महिला, कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ६९ वर्षीय व्यक्ती, जत तालुक्यातील अंकले येथील ६६ वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील रिळे येथील ७० वर्षीय व्यक्ती आणि मालगाव येथील ७२ वर्षीय महिला या पाच जणांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण २९४
बरे झालेले १८३
उपचारात १०२
मयत ०९








