जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने प्रेंच टेनिस स्पर्धेत अजिंक्मयपद पटकावत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या माध्यमातून 19 ग्रँड स्लॅम पदके पटकावण्याची त्याची कामगिरी केवळ अतुलनीय नव्हे, तर नव्या क्रांतीच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणावे लागेल. मागचे जवळपास दीड दशक टेनिस विश्व रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि जोकोविच या तीन महान खेळाडूंनी व्यापले आहे. प्रेंच ओपनचा विचार केल्यास या स्पर्धेवर प्रामुख्याने नदालचेच वर्चस्व राहिले आहे. 2005 पासून 2020 पर्यंत तब्बल 13 वेळा त्याने या स्पर्धेच्या विजेतेपदावर मोहोर उमटविली आहे. म्हणूनच त्याला क्ले कोर्ट वा लाल मातीवरचा बादशहा म्हणतात. म्हणूनच प्रेंचच्या उपांत्य फेरीत टेनिसच्या या बादशहाला हरविणे, ही कामगिरी मोठीच होय. स्वतः जोकोविच याची तुलना एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेशी करतो, यातूनच तिचे मोल लक्षात येते. अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतर पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याची त्याची कामगिरीही अशीच बिनतोड. ग्रीसच्या स्टेफानोसच्या तोंडातील घास त्याने आपल्या अनुभव व जिद्दीच्या बळावर ज्या पद्धतीने काढून घेतला ते अफलातूनच म्हणावे लागेल. यापूर्वी 2016 मध्ये नोवाकने या स्पर्धेत विजयाला गवसणी घातली होती. त्यानंतर 2021 च्या स्पर्धेवर नाममुद्रा उमटवत त्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. फेडरर व राफेल यांनी प्रत्येकी 20 ग्रँड स्लॅम पदके प्राप्त केली आहेत. त्यांच्यात व जोकोविचमध्ये फक्त एकाच पदकाचे अंतर आहे. विम्बल्डन स्पर्धेचे पडघम वाजू लागले असून अमेरिकन ओपनही होऊ घातली आहे. स्वाभाविकच तिघांमध्ये चुरस असेल. फेडररने विम्बल्डनसाठीच प्रेंचमधून माघार घेतली, असे सांगितले जाते. या 39 वषीय महान खेळाडूला आता तंदुरुस्तीसाठी झगडावे लागत आहे. मात्र आपल्या टेनिस कारकिर्दीची सांगता दमदार विजेतेपदाने करण्याचे त्याचे स्वप्न असेल. अलीकडे विजेतेपदे या तीन दिग्गजांभोवतीच फिरत राहिली असली, तरी कुठे तरी त्यांच्या वयाची जाणीव होऊ लागली आहे. शेवटी आपल्या प्रकाशाने सर्वांना दिपविणाऱया सूर्यालाही मावळावे लागते. आगामी काळात त्यांनाही या दिव्यातून जावे लागेल. अर्थात तोवर नवा सूर्य उगवलेला असेल. अशा उगवत्यांनी आपली चुणूक दाखविली, हेही आश्वासक. स्टेफानोसचा याबाबत प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याने अंतिम सामना गमावला असला, तरी ज्या पद्धतीने त्याने जिंदा दिल खेळ केला, ते सारे अपेक्षा वाढविणारे होय. अर्थात अशा सळसळत्या खेळाबरोबरच टेनिस या खेळाला नवा आयाम देण्याची पूर्वसूरींची परंपरा नव्या दमाच्या टेनिसपटूंना पुढे चालवावी लागेल. लहानग्या चाहत्याला टेनिस रॅकेट भेट देण्याचा जोकोविचवरील व्हायरल झालेला व्हीडिओ जगभर पाहिला गेला, तो त्यातील हृद्यपणामुळे, हेही लक्षात घेतले पाहिजे. खरेतर सामन्यात मागे पडत असलेल्या जोकोविचला हा लहानगा प्रोत्साहन देत होता. सर्व्हिस राख, बॅकहँडवर हल्ला कर, हे त्याचे बोल एखाद्या प्रशिक्षक वा गुरुसारखे होते. त्यामुळे आपण सामन्यात वापसी करू शकलो, या जोकोविचच्या उद्गारातून त्याच्यातील प्रांजळपणाच अधोरेखित होतो. फेडरर, नदालनेही वेगवेगळय़ा प्रसंगातून आपल्यातील माणूसपण, खेळाप्रतिची नि÷ा, समर्पणभाव दाखवून दिला आहे. ही टेनिसची खरी श्रीमंती आहे, हे विसरता कामा नये. महिलांच्या अंतिम स्पर्धेत बार्बोरा पेजिकोव्हाने मिळवलेले यशही उल्लेखनीय होय. तिने आपले हे विजेतेपद माजी विम्बल्डन विजेत्या याना नोवातना हिला समर्पित केले आहे. यानाने बार्बोराला घडविले, पैलू पाडले. 2017 ला कर्करोगाने तिचे निधन झाले, हा बार्बोरासाठी कठीण प्रसंग होता. विजेतेपदानंतर तिने आकाशाकडे पाहत यानाला दिलेली मानवंदना बरेच काही सांगून जाते. डबल्समध्येही यश मिळवून दुहेरी मुकुट संपादन करण्याची तिची कामगिरी अपेक्षा वाढविणारी आहे. पुढे विम्बल्डन, अमेरिकन ओपनमध्येही स्वाभाविकपणे चुरस पहायला मिळणार, हे निश्चित आहे. फॉर्म हरवलेली सेरेना विल्यम विजयासाठी आसुसलेली असेल तर मानसिक ताणामुळे प्रेंचमधून माघार घेतलेली नाओमी ओसाका विम्बल्डनमध्ये सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता असेल. टेनिस हा जसा कौशल्याचा, क्षमतेची परीक्षा पाहणारा खेळ आहे, तसाच तो शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचाही क्रीडाप्रकार आहे. दुखापतीमुळे अनेक खेळाडूंचे करियर संपल्याचे वा मर्यादित राहिल्याचे आपण पाहिले आहे. खेळाडूंना जसा वेळोवेळी दुखापतींशी सामना करावा लागतो, तसा अपेक्षांचे ओझे, मानसिक ताणतणाव या बाबींशीही लढावे लागते. कोणताही सामना हा गंभीरपणेच खेळायला हवा. परंतु, यशापयशाचा अधिक विचार करण्यापेक्षा खेळाचा आनंद मनमुराद लुटणे महत्त्वाचे आहे. म्हणजे अपेक्षाभंग वा नैराश्य येत नाही. विक्रम प्रस्थापित होणे नि तोडले जाणे, ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. क्रिकेट, फुटबॉल, ऑलिंपिक असेल किंवा अन्य स्पर्धा असतील. येथे सतत नवनवीन विक्रमांची नोंद होत असते. हे विक्रम हा एक भाग झाला. त्याच्यापलीकडेही जग आहे, हे खेळाडूंनी विसरू नये. उद्या आकडेवारीच्या स्तरावर जोकोविच कदाचित फेडरर व नदालला मागे टाकूनही पुढे जाईल. परंतु, प्राधान्याने मनावर रुंजी घालत राहील ती फेडररची रॅकेट. क्लास वा उच्चतम दर्जा कुठल्या विक्रमात मोजता येत नसतो. क्ले कोर्टवर नदालने किती पदके मिळवली यापेक्षा तेथील त्याचे ते धडधडणे चिरंतन आहे. म्हणूनच टेनिसपटू असतील वा अन्य खेळातील खेळाडू. त्यांनी आपला उच्च दर्जाच्या खेळाचे क्रीडा रसिकांना दर्शन घडवावे. त्यांची एक खेळीही मनात घर करण्यासाठी पुरेशी असते. नवी पिढीही अशा नवनवोन्मेषी प्रतिभेचे दर्शन घडवेल, असा विश्वास वाटतो.
Previous Articleनेक्सॉन-क्रेटाच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
Next Article झी पहिल्या क्रमांकाचे चॅनेल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








