नवीन वर्ष हे मागील कटू अनुभवापेक्षा आनंददायी असेल ही आशा बाळगून असलेल्या गोव्यातील प्रत्येक नागरिकाच्या आशा, आकांक्षा व स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी येणाऱया वर्षात खूप मोठी तयारी करावी लागणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाला आहे. गोव्यातील सर्व समुद्र किनारे देशी पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून आले आहेत. आजचा सूर्य क्षितिजाआड गेल्यानंतर उद्याच्या उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून गोव्यासह संपूर्ण जग 21व्या शतकातील 21 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. सन् 2020 च्या पहिल्या तिमाहीत कोरोना नावाच्या महामारीने भारतात प्रवेश केला व जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या गोव्याला त्याची मोठी झळ बसली. लॉकडाऊनचा पहिला तडाखा बसला तो राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असलेल्या पर्यटन व्यवसायाला. पर्यटनाचा मुख्य हंगामच एका झटक्यात थंडावला. अगदी हातावर पोट असलेल्या सामान्य मजुरापासून, कामगार, छोटे मोठे व्या वसायिक व उद्योग क्षेत्राला या संकटाने गुडघे टेकवायला लावले. राज्याचे आक्रसलेले अर्थकारण नुकतेच कुठे रुळावर येऊ लागले आहे. सुरुवातीचे तीन महिने बंद दाराआड एका अनामिक भीतीखाली दडपलेला गोमंतकीय नागरिक या संकटातून नुकताच कुठे सावरू लागला आहे. कोरोनाचे संकट टळले नसले तरी त्याच्यासोबत जगण्याची जीवनशैली त्यांनी आत्मसात केली आहे. सरकारला येणाऱया वर्षात गोमंतकीय जनतेमध्ये जगण्याची नवी उर्मी व विश्वास निर्माण करावा लागेल. त्यासाठी जगण्याचे साधन असलेला रोजगार व व्यवसाय क्षेत्रात पूर्ववत उभे राहण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.
येणारे वर्ष हे राज्यातील भाजपा सरकारसाठी अनेक अर्थानी आव्हानात्मक आहे. विधानसभेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असून जनमत कौलाला सामोरे जाताना पाच वर्षांचा हिशेब द्यावा लागणार आहे. विधानसभेची सेमिफायनल मानल्या जाणाऱया जि. पं. निवडणुकीत मतदारांनी भाजपाला पुन्हा संधी देऊन विश्वास दाखवला. जनतेचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांच्या इच्छा आकांक्षांना बळ देण्यासाठी नवीन वर्षांपासून ठोस नियोजन करावे लागेल.
विविध क्षेत्रांची विस्कटलेली घडी नीटनेटकी करताना अर्थकारणाचा पाया असलेल्या औद्योगिक क्षेत्राला चालना देणारे व दूरगामी परिणाम साधणारे धोरण आखावे लागेल. या संकटकाळात राज्याच्या महसुलाचा मुख्य स्रोत असलेल्या खाण उद्योग आणि पर्यटन व्यवसायाच्या मर्यादा दाखवून दिल्या. या परिस्थितीचे अवलोकन केल्यास अर्थव्यवस्थेला नवीन आयाम देताना अन्य उद्योग क्षेत्रांवर अधिक भर देऊन नवीन वर्षाची नवी सुरुवात करत आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकावे लागणार आहे.
राज्यात ‘फार्मास्युटीकल’ म्हणजे औषध उत्पादन क्षेत्राला वाव आहे. अनेक जागतिक कंपन्यांचा समावेश असलेल्या देशभरातील 17 टक्के औषध निर्मिती उद्योग गोव्यात आहेत. ही जमेची बाजू असली तरी आयटीसारख्या सेवा क्षेत्रातील उद्योगांबरोबरच उत्पादन क्षेत्रातील कारखाने गोव्यात येण्यासाठी औद्योगिक धोरणात लवचिकता हवी. ‘स्वयंपूर्ण गोंय’ या योजनेतून ग्रामीण भागात कृषी क्षेत्राच्या माध्यमातून उत्पादन व रोजगाराला प्रोत्साहन देण्याचे सरकारचे पाऊल स्वागतार्ह आहे. या जोडीलाच ग्रामीण पर्यटन विकसित होण्यासाठी साधनसुविधा उभारणे गरजेचे आहे. कोरोनाच्या तडाख्यात कोलमडलेल्या उद्योग-व्यवसायांना नव्याने उभारी देताना राज्यातील बांधकाम क्षेत्रासह करमणूक, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रातील त्रुटी दूर करून भविष्यातील नवीन आव्हानांसाठी तयार राहावे लागेल. उत्सवप्रिय गोव्याला या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढत मनोरंजन व करमणुकीचे बंद झालेले पडदे पुन्हा उघडताना निखळ व सुरक्षित वातावरणात येथील कला पुन्हा कशा खुलतील याची हमी द्यावी लागेल. राज्याचा विकास साधताना पर्यावरणीय संतुलन व नैसर्गिक संपत्तीचे जतन हा समतोल राखण्याचे भान तेवढेच महत्त्वाचे आहे. गोव्यातील नागरिक विकासाबाबत जेवढा आग्रही आहे तेवढाच पर्यावरणाबाबतही जागरूक आहे, हे त्याने वेळोवेळी सरकारला दाखवून दिले आहे.
कोरोनाच्या या महामारीने असहय़ चटके दिले तरी, आयुष्याकडे नव्याने पाहण्याची संधीही दिलेली आहे. या संकटातून संधी शोधत पुढे जाण्याची धडपड करणाऱया प्रत्येकाला वाट दाखविण्याची जबाबदारी सरकारची आहे. भविष्यात अशी महामारी पुन्हा येऊन धडकल्यास आरोग्य यंत्रणांना या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आत्तापासूनच सज्ज करावे लागेल. शिक्षण क्षेत्रातील उणिवा लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण पद्धती कशी प्रभावी होऊ शकेल यासाठी साधनसुविधा व प्रशिक्षण देतानाच नवीन शैक्षणिक धोरण आखणे ही काळाची गरज आहे. या सर्व गोष्टींचे नव्याने नियोजन करताना पक्का विचार व ठोस कृती हवी. उगवणारा दिवस तोच असला तरी आव्हाने नवीन असतील. त्यांना सामोरे जाण्याची, भिडण्याची तयारी या नवीन वर्षांपासून करावी लागणार आहे. नवीन वर्ष हे मागील कटू अनुभवापेक्षा आनंददायी असेल ही आशा बाळगून असलेल्या गोव्यातील प्रत्येक नागरिकाच्या आशा, आकांक्षा व स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी येणाऱया वर्षात खूप मोठी तयारी करावी लागणार आहे.
सदानंद सतरकर








