प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या सहा महिन्यांपासून नवीन रेशनकार्डचे काम बंद असल्याने सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. स्वतःजवळ रेशनकार्ड नसलेल्या गोरगरिबांना रेशनपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्डच्या कामाला चालना कधी? मिळणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
कोरोनामुळे अधीच सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. दरम्यान, अनेकांच्या नोकऱया व उद्योगधंदे बंद झाल्याने सर्वसामान्यांसमोर रेशनचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच स्वतःजवळ रेशनकार्ड नसल्याने आणि नवीन रेशनकार्ड तयार करून मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे किराणा मालाचे दर वाढले आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून नवीन रेशनकार्ड मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविताना अडचणी निर्माण होत आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून हे काम बंद असल्याने संबंधित कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. मात्र, रेशनकार्डच्या कामाअभावी माघारी परतावे लागत आहे. शहरातील कर्नाटक वनच्या कार्यालयातून आधारकार्ड, रेशनकार्ड व शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जाते. मात्र सध्या इतर शासकीय कागदपत्रे वेळेत मिळत असली तरी नवीन रेशनकार्डचे काम ठप्प आहे. इतर शासकीय सुविधांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचे असले तरी हे काम सुरू करण्याकडे कानाडोळा झाल्याने अनेकांना शासकीय सुविधापांसून वंचित राहावे लागत आहे.
आचारसंहितेपूर्वी कामाला सुरुवात करा
येत्या काळात ग्राम पंचायत व मनपा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यास आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे पुन्हा नवीन रेशनकार्डच्या कामाला स्थगिती मिळणार असून रेशनकार्डचे काम लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे तातडीने या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.









