मुंबई \ ऑनलाईन
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता सात महिने पूर्ण होत आहेत. कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार केव्हाही तयार आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली असून, जोपर्यंत कृषी कायदे परत घेतले जात नाही, तोपर्यंत शेतकरी घरी जाणार नाहीत, असा इशारा सरकारला दिला. या पार्श्वभूमीवर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी , सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, व इतर नेत्यांनी माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे.
यावेळी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्यशासनाने याबाबत ठोस भूमिका मांडावी, असा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला. शरद पवार यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. केंद्राच्या या नवीन शेती कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली, अनेकदा पत्रव्यवहारही केला. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही, असे म्हणत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.









