प्रतिनिधी / देवगड:
हापूस आंब्याच्या नावावर यापूर्वी कर्नाटक, बल्साड, गुजरात येथील आंबा मार्केटमध्ये विक्री होत होता. त्यामुळे देवगड व रत्नागिरी येथील हापूसला याचा फटका बसत होता. त्यामुळे कोकण पट्टीतील आंबा बागायतदारांनी याबाबत लढा देऊन कोकणातील हापूसला जिआय मानांकन मिळवून घेतले आहे. त्यामुळे यापुढे कोकणातील आंबा हा हापूस आंबा म्हणूनच विक्री होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात देवगड, मालवण व वेंगुर्ला या तीन तालुक्यात सुमारे 8 हजार आंबा बागायतदार आहेत. या सर्व आंबा बागायतदारांची नोंदणी जीआयमार्फत करण्याचे काम सुरू असून येत्या हंगामात हापूस आंबा जीआयच्या नोंदणीतून मार्केटमध्ये जाण्यासाठी जीआय नोंदणीसाठी असलेल्या संस्थांचे प्रयत्न आहेत.
हापूस आंब्याला जीआय नोंदणीमुळे त्यांच्या आंब्याला योग्य मिळण्यास मदत होणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार ऍड. अजित गोगटे म्हणाले, देवगड हापूस बरोबर सिंधुदुर्गातील मालवण व वेंगुर्ला तालुक्यातील आंब्याला हापूस आंब्याचा जीआय नोंदणी करता येणार आहे. आंबा बागायतदारांना याबाबत प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी शासन स्तरावर विविध कार्यशाळा आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीआयमुळे आंबा बागायतदारांना जरी प्रत्यक्ष फायदे दिसून येत नसले तरी जीआयमुळे आंब्याला गुणवत्ता प्राप्त झाली आहे. कोकणाबाहेरून येणाऱया आंब्याला आता हापूस आंबा म्हणून कुठेही विकता येणार नाही. देवगड हापूस आंब्याची चव, रंग व गंध यामुळे ओळखला जातो. जीआय नोंदणीसाठी आंबा बागायतदारांना संस्थेमार्फत आवाहन केले जात आहे. जीआय नोंदणी झाल्यानंतर आंबा बाजारपेठेत ग्राहकाला खात्रीलायक आंबा वाटेल. ग्राहकाची फसवणूक होणार नाही व बागायतदारालाही फायदा व समाधान मिळेल,असेही ते म्हणाले.









