विद्यमान उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सला आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी त्याचे बरेचसे खापर कर्णधार धोनी सातव्या स्थानी फलंदाजीला उतरला, त्यावरही फोडले गेले. 217 धावांचे खडतर आव्हान असताना धोनीने सॅम करण व केदार जाधव यांच्यासारख्या फलंदाजांना प्रथम पाठवले आणि स्वतः सातव्या स्थानी उतरला, यावर खरपूस टीका झाली. स्वतः पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी धोनी आला, त्यावेळी त्याला याबाबत विचारले गेले आणि तो प्रत्युत्तरादाखल म्हणाला, ‘मी प्रदीर्घ कालावधीपासून फलंदाजी केलेली नाही आणि 14 दिवसांचा क्वारन्टाईन पोषक नव्हता’.
धोनीचा हा क्वारन्टाईनचा संदर्भ चेन्नईच्या पथकातील 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरचा होता. चेन्नईच्या पूर्ण पथकाचा क्वारन्टाईन कालावधी त्यानंतर वाढवण्यात आला होता आणि यामुळे अगदी महत्त्वाच्या दिवशी त्यांना सराव करता आला नव्हता. धोनीने या सामन्यात 17 चेंडूत नाबाद 29 धावांची आतषबाजी केली. त्यात डावातील शेवटच्या षटकात फटकावलेल्या 3 षटकारांचा समावेश होता.
धोनीने थेट उल्लेख केला नाही. पण, मुरली विजयच्या 21 चेंडूत चेंडूमागे एक धाव या समीकरणाने केलेली संथ फलंदाजी चेन्नईच्या पराभवाचे आणखी एक महत्त्वाचे कारण ठरली. ‘217 धावांचे आव्हान असताना आमची सुरुवात आक्रमक असायला हवी होती. पण, तसे झाल्याचे दिसून आले नाही. स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी अतिशय दमदार फलंदाजी केली. याशिवाय, त्यांच्या गोलंदाजांनाही शिस्तबद्ध माऱयाचे श्रेय द्यायला हवे’, असे धोनी याप्रसंगी म्हणाला.









