वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती : सर्व गुन्हय़ांसाठी मोठय़ा रकमेच्या दंडाची तरतूद
प्रतिनिधी / पणजी
वाहतुकीत शिस्त यावी, अपघात कमी व्हावेत तसेच वाहनचालकांना शिस्त लागावी या हेतूने नवीन मोटार वाहन कायदा 1 मे पासून लागू करण्यात येणार असून त्याला पर्याय नाही, असे निवेदन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले आहे.
नियम पाळणाऱयांना या कायद्यातील दंड लागू नाही आणि नियम मोडणाऱयांना तो भरावा लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, या नवीन कायद्यातील दंडाची रक्कम किमान रु. 500 असून कमाल रु. 1 लाख असल्याची माहिती देण्यात आली. शिवाय वाहन परवानाही किमान 3 महिने तरी निलंबित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकार परिषदेत नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची तपशीलवार माहिती दिली. त्याची अधिसूचना जरी काढण्यात आली असली तरी कार्यवाही 1 मे पासून होणार आहे. केंद्र सरकारने हा कायदा लागू केल्यामुळे तो नाकारता किंवा टाळता येत नाही. तरी देखील गोवा सरकारने त्या कायद्यातील किमान दंड निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक दंडाची रक्कम भरमसाठ
यापूर्वीच्या कायद्यात विविध वाहनांसाठी विविध दंडाची रक्कम होती, परंतु आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दंडाची रक्कम वाढवून समान करण्यात आली आहे. बहुतेक कलमांत वाहन परवाना किमान 3 महिने तरी निलंबित ठेवण्याची तरतूद आहे. दुचाकीवर दोघेजण प्रवास करू शकतात. जादा प्रवासी असेल, हेल्मेट नसेल, किंवा वेग मर्यादेच्या बाहेर गेल्यास रु. 1000 दंड आणि वाहन परवाना 3 महिने निंलंबित करण्यात येणार आहे. वाहन परवाना नसला तर रु. 10,000 दंड भरावा लागणार असून प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) नसल्यास रु. 10,000 भृर्दंड पडणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवले तर रु 10,000 दंड, चारचाकीमध्ये सीटबेल्ट सर्वांनी बांधला पाहिजे, अन्यथा रु 1000 दंड, वाहनात क्षमेतेपेक्षा जास्त वजनाचा माल असल्यास रु. 20,000 दंड, अशा मोठय़ा रकमेचे दंड आकारण्याची तरदूत या नवीन कायद्यात आहे.
नवीन मोटर वाहन कायदा व त्यातील वाढीव दंडाची तरतूद याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश तालुका कार्यालयांना देण्यात आल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले विरोधी पक्षांनी या प्रकरणी राजकारण न करता सहकार्य करावे. उगाच विरोधासाठी विरोध नको, असेही त्यांनी नमूद केले. दडांची रक्कम जास्त, रस्ते खराब आहेत, कोरोनाचे संकट, अशा अनेक कारणांमुळे हा नवीन कायदा जनतेच्या मागणीनुसार प्रलंबित ठेवला होता. परंतु आता तो टाळता येणार नाही व लाबंवताही येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन कायद्याचे राजकारण नको !
नवीन मोटर वाहन कायदा व त्यातील दंडात्मक तरतुदी या रस्ता सुरक्षेसाठी आहेत. तो कायदा जनतेला सतावण्यासाठी नसून जनतेच्या भल्यासाठी आहे. या कायद्यातून मंत्र्यांचीसुद्धा सुटका नाही. कायद्याबाबत कोणी अफवा पसरवू नयेत, सर्वांना कायदा समान आहे. मंत्री, आमदारांच्या वाहनांवर जर जास्त काळ्य़ा फिल्म लावलेल्या असतील, त्या काढायला लावतो. पण या कायद्याचे कोणी राजकारण करू नये. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत याला विरोध करतात. त्याला काही अर्थ नाही. ते मुख्यमंत्री असते तर त्यांनी विराध केला असता का, अशी विचारण मंत्री माविन गुदिन्हो यांनी केली.
टॅक्सांना लवकरच मीटर बसवणार!
येत्या दोन आठवडय़ांत टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्याचे काम सुरू होणार असून पहिल्या 6 महिन्यांत जे टॅक्सीवाले मीटर बसवतील त्याचा खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. त्या मीटरवरून टॅक्सी संघटनांनी गोंधळ घालू नये, धमक्या देऊ नये तसेच ‘गोवा माईल्स’ रद्द करण्याची भाषा करू नये. गोमंतकीय टॅक्सीवाले या पर्यटन व्यवसायात टिकून रहावेत, म्हणून 15 वर्षांचा दाखला बॅच मुदतीचा आहे. त्यात बदल नाही, असे सांगून मंत्री गुदिन्हो यांनी ‘गोवा माईल्स’ या ऍप टॅक्सी सेवेला मान्यता असल्याचे नमूद केले. ओला उबर-अपना भाडा यांना मान्यता नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.









