कोल्हापूर / प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करताना चंद्रकांतदादा पाटील यांनी नवाब मलिक यांना उद्धव ठाकरे स्वत: बोलवून राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील. तसेच मालिकांचा राजीनामा घेतला नाही तर भाजप अधिवेशन चालू देणार नाही असेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण केले. या उपोषणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. संभाजीराजे यांच्या उपोषणासंदर्भात बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, की संभाजीराजे यांना मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करावे लागले हे दुर्दैव असून संभाजीराजे यांना सरकारने आतापर्यंत कितीतरी तारखा दिल्या आहेत. संभाजीराजेंचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला तर तो आनंद क्षणभंगुर आहे. तर भाजप मराठा समाजाच्या मागण्यासाठी रस्त्यावर लढत राहील असेही ते पुढे म्हणाले.=
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गेले आठवडाभर आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरूनही चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात आणि शेतीपंपाची विजबिले दुरूस्तीसाठी राजू शेट्टी यांनादेखील उपोषण करावा लागतोय हे काही योग्य नाही असे ते म्हणाले. तसेच गेले आठवडाभर चालू असलेल्या आंदेलनाची शासनाने दखलही घेतली नाही त्यामुळे आम्ही राजू शेट्टी यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहोत, असे ते यावेळी म्हणाले.