चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकारांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा समावेश आहे. नवाजुद्दीनने नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’द्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले होते. पण नवाजुद्दीनने आता ओटीटी जगताला रामराम ठोकला आहे. नवाजुद्दीनच्या या घोषणेमुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत.
‘रात अकेली है’, ‘घूमकेतू’ आणि ‘सीरियस मॅन’ यासारख्या उत्तम वेबसीरिजमध्ये काम केले आहे. नवाजुद्दीनच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म्स आता मोठय़ा प्रॉडक्शन हाउससाठी धंदा ठरल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे. हा प्लॅटफॉर्म अनावश्यक शोंसाठी डम्पिंग ग्राउंड ठरले आहे. असे अनेक शो आहेत, जे पाहण्यासाठी योग्य नाहीत. सेक्रेड गेम्समध्ये काम केले होते, तेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये काम करण्याचा एक उत्साह आणि आव्हान होते, पण आता ते राहिले नसल्याचे त्याने म्हटले आहे.
मोठे प्रॉडक्शन हाउस आणि कलाकारांसाठी हा आता धंदा ठरला आहे. बॉलिवूडमधील सर्व प्रमुख निर्मात्यांनी सर्व मोठय़ा ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत आकर्षक करार केले आहेत. अमर्यादित कंटेंट निर्माण करण्यासाठी निर्मात्यांना मोठी रक्कम मिळते, प्रचंड प्रमाणाने गुणवत्तेला मारून टाकले असल्याचे नवाजुद्दीन म्हणतो.









