प्रतिनिधी/ पणजी
नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांची अंतिम परीक्षा 24 एप्रिल 2021 पर्यंत घ्यावी, असे निर्देश गोवा माध्यमिक- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) शाळांना दिले असून तशा आशयाचे परिपत्रक जारी केले आहे. दहावी- बारावी परीक्षा 26 एप्रिलपासून चालू होणार असून त्यासाठी शाळा उपलब्ध करण्याबरोबरच साधन सुविधा देण्याकरीता वरील सूचना करण्यात आली आहे.
कोरोनाचे संकट आणि मर्यादीत कालावधी यामुळे शाळांनी त्यांच्या सोयीनुसार परीक्षा घेण्यास हरकत नाही. तसे स्वातंत्र्य मंडळाने शाळांना दिले आहे. ज्या शाळांनी प्रथम चाचणी तसेच पहिली सत्र परीक्षा घेतली असेल त्यांनी ती पुन्हा घेण्याची गरज नाही असेही त्या परीपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रश्न पत्रिका निश्चित करण्याचे स्वातंत्र्यही शाळांना देण्यात आले असून जेवढा आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे तेवढय़ावरच प्रश्नपत्रिका काढावी असे मंडळाने शाळांना सूचित केले आहे. अभ्यासक्रमातून 30 टक्के कपात करण्यात आली असून उर्वरित 70 टक्क्यावरच प्रश्नपत्रिका निश्चित करावी, असे परीपत्रकात म्हटले आहे.
इतर इयत्तांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असून ती प्रक्रिया तशीच चालू रहाणार आहे. लेखी परीक्षा- प्रात्यक्षिक परीक्षा यासाठी नववी- अकरावीच्या मुलांना शाळेत बोलवावे, असेही परीपत्रकातून बजावण्यात आले आहे.









