प्रतिनिधी/ पणजी
20 सप्टेंबरनंतर इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे वर्ग व महाविद्यालयीन विभाग सुरू करण्याचा विचार सरकारने चालविला आहे. पालक-शिक्षक संघटनेशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेण्यात येईल. मात्र अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असे काल शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने 7 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये विद्यालये व उच्च शिक्षण संस्था काही प्रमाणात 21 सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सामाजिक दुरी बाळगून गोव्यातील इयत्ता 9 ते 12 व महाविद्यालये काही प्रमाणात सुरू करण्याचा विचार चालविल्याचे ते म्हणाले.
राज्यात रुग्णांवर होतात उत्तम उपचार
गोव्याची आजची स्थिती पाहिल्यास आतापर्यंत 22890 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. 5030 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर 17592 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 268 रुग्णाना मृत्यू आला. या मृत्युमागे वेगवेगळी कारणे असतील. कोमोर्बीड हे एक कारण तसेच इस्पितळात पोचण्यास उशीर होणे हे दुसरे कारण असेल तर निष्काळजीपणा हे तिसरे कारण असू शकते. गोव्यात सध्या उत्तम प्रकारे रुग्णावर उपचार होत आहेत. कोविड इस्पितळ आणि केअर सेंटर या ठिकाणी चांगल्याप्रकारे रुग्णांची काळजी घेतली जात आहे. आजही उत्तर गोव्यात 162 खाटा खाली आहेत. दक्षिण गोव्यात 1006 ही खाटांची क्षमता आहे व 520 खाटा खाली आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकालाही मोफत जेवण, कीट
अनेक लोक गृह विलगीकरणात रहाण्यास पसंती देतात. त्यांना फोनवर संपर्क साधून डॉक्टरी मदत दिली जाते. मात्र तरीही काही लक्षणे दिसून आल्यास इस्पितळात येऊन उपचार घ्यायला हवे. इएसआय हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटल तसेच आयडी हॉस्पिटल फोंडा व गोमेकॉ इथे उपचार केले जातात. मध्यंतरी खाटा कमी होत्या, त्यावेळी सरकारने नवीन दक्षिण गोवा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रूपांतर केले. मोफत चांगली सेवा देण्याचे काम गोवा राज्य करते. इतरत्र अशी सेवा देशात कुठेच दिली जात नाही. रुग्णासोबतच त्यांची निगा घेणाऱयांना मोफत जेवण व पीपीई कीट दिले जाते.
आत्मनिर्भर भारतच्या धर्तीवर स्वयंपूर्ण गोवा
कोरोना संकट काळातही पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आत्मनिर्भार भारतची हाक दिली. त्याच धर्तीवर स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी आम्ही सर्वानाच हाक दिली आहे. कोरोनाशी संबंधित पॅकेजिस केंद्रीय वित्तमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी जाहीर केल्या आहेत. पण त्याचा मुख्य हेतू होता आत्मनिर्भर भारत. अर्थव्यवस्था, साधनसुविधा, कार्यपद्धती, व्हायब्रंट डेमोग्राफी आणि मागणी हे पाच मुख्य घटक आहेत. 20 लाख कोटींची पॅकेज त्यासाठी जाहीर केली. त्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आपण अभिनंदन करतो. गोवा सरकारच्या अनेक खात्यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेज सोबत काम सुरू केले आहे.
नियमित प्राणायम करणे उपयुक्त ठरते
आपल्याला कारोनाची बाधा झाल्यानंतर आपण गृह विलगीगरणात राहिलो. नियमित आहार, प्राणायम सातत्याने केल्यास प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनावर मात करता येते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपला हा स्वतःचा अनुभव आहे. प्राणायम, सूर्यनमस्कार नियमितपणे करावे. पाणी व आहार योग्यप्रकारे घेतल्यास निश्चितच कोरोनापूर्व सुद्धा फायदा होऊ शकतो. आपल्यासोबत काही कर्मचारीही पॉझिटीव्ह झाले, देवकृपेने ते बरे झाले. मागील दहा दिवस प्रसारमाध्यमे व लोकांनाही आपण भेटलो नाही. अजून पुढील 7 दिवस लोकांना भेटणार नाही. 17 तारीख नंतर नियमित बैठका व लोकांना रोजचे काम महालक्ष्मी या निवासस्थानावरून करण्यात येईल. लोकांच्या गैरसोयीबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यीनी दिलगिरी व्यक्त केली.
केंद्राच्या हस्तक्षेपानंतरच दिल्लीत मिळाली लोकांना सेवा
मागील दोन दिवस काहीजणांनी असे भासविले की तेच लोकांची चांगली काळजी घेतात. पण जिथे त्यांची सत्ता आहे तिथे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतरच कोरोनावर नियंत्रण आले असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ‘आप’ ला टोला मारला. आपण दिल्लीबाबतच बोलत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. गृहमंत्री व केंद्रीय आरोग्यमंत्र्यानी हस्तक्षेप केल्यानंतरच दिल्लीत रुग्णांना सेवा दिली जाते. गोव्यात कोविडचे चांगले काम केले गेले. आरोग्य अधिकारी, पोलीस, अन्य अधिकारीणी यांनी चांगले काम केले त्याना कोरोनाची लागण झाली, पण त्यांनी त्यावर मात करून सेवा दिली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गांधी जयंतीदिनी ‘आत्मनिर्भर भारत’चा शुभारंभ
पशुसंवर्धन खाते, कृषी, वन, पर्यावरण व जैवविविधता खाते यांनी आत्मनिर्भर भारतचे काम सुरू केले आहे. उर्वरीत खात्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. 17 खात्यांना प्रशिक्षणही दिले आहे. अधिकारी कर्मयोगी पद्धतीने काम करीत आहेत. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी सर्व पंचायती व नगरपालिकांमध्ये आत्मनिर्भर भारत कामाचा शुभारंभ होणार असून त्यासाठी सर्वेक्षणही केले आहे. बँका, नाबार्ड, आरबीआय यांच्यासोबत खात्यांच्या बैठका घेऊन योजनेचा कसा फायदा होईल यावर चर्चा केली आहे. किसान क्रेडीट कार्ड दूध उत्पादकांनाही दिले आहे. इमारत बांधकाम क्षेत्र यांनाही याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत गोव्यातही अनेकांना लाभ मिळवून दिला आहे.









