प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनाच्या तिसऱया लाटेची भीती असतानाच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या 23 ऑगस्टपासून नववी, दहावी तसेच अकरावी आणि बारावीचे वर्ग दिवसाआड दोन शिफ्टमध्ये भरविण्यात येणार आहेत. आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत ऑगस्टच्या अखेरीस निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोना परिस्थितीसंबंधी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे पार पडलेल्या कोविड टास्क फोर्स आणि विविध खात्यातील अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन बॅच करून विद्यार्थ्यांसाठी दिवसाआड वर्ग भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी स्वतंत्रपणे मार्गसूची जारी केली जाणार आहे. आठवीचा वर्ग आणि प्राथमिक शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय ऑगस्टच्या अखेरीस घेतला जाणार आहे. तोपर्यंत ऑनलाईनद्वारेच शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.









