वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीत निर्णय : शिक्षण खात्याकडून लवकरच मार्गसूची : सहावी-नववीपर्यंत ‘विद्यागम’
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असणाऱया शाळा-पदवीपूर्व महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर शनिवारी महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर चर्चा झाली. त्यानुसार 1 जानेवारीपासून दहावी आणि बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू होणार आहेत. त्याकरिता शिक्षण खात्याकडून लवकरच मार्गसूची जारी करून नियम व कार्यवाहीबाबत माहिती दिली जाणार आहे. उर्वरित वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसला तरी जानेवारीच्या सुरुवातीपासून सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यागम’ योजनेंतर्गत शिक्षण पुन्हा सुरू केले जाणार आहे.
राज्यातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक पार पडली. यावेळी दहावी आणि बारावीचे वर्ग नववर्षाच्या प्रारंभापासून सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच 15 जानेवारीपर्यंत परिस्थितीचे अवलोकन करून उर्वरित वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, याआधीपासून सुरू असणारी ऑनलाईन शिक्षण व्यवस्थाही सुरू राहणार आहे.
दहावी, बारावीचे वर्ग ग्नसुरू करण्यात येणार असल्याने खबरदारी उपायोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अधिकाऱयांना दिल्या. राज्य कोविड-19 तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारसींनुसार विद्यार्थ्यांनी शाळेत आणि विद्यागमसाठी हजर होताना पालकांचे संमतीपत्र आणणे सक्तीचे आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी कोविड चाचणी करावी का?, याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. याविषयी प्रतिक्रिया देताना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार म्हणाले, कोविड मार्गसूचीचे पालन करून दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंबंधीचा निर्णय पालकांवर सोपविण्यात आला आहे. सर्दी, ताप, खोकला असणाऱया विद्यार्थ्यांनी हजर राहू नये. वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना हजर राहण्यासाठी बळजबरी केली जाणार नाही. प्रत्येक वर्गामध्ये 15 विद्यार्थ्यांनाच आसनव्यवस्था केली जाईल. सामाजिक अंतरासह सॅनिटायझर आणि मास्कचा वापर सक्तीचे असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अभ्यासक्रमात कपात करण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. परीक्षा विचारात घेऊन अभ्यासक्रमातील कपातीबाबत निर्णय घेतला जाईल. शाळेत हजर होणाऱया विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. सुरुवातीला अर्धा दिवस वर्ग घेण्यात येतील. दहावी आणि बारावीसाठी बोर्डाची परीक्षा असल्याने 1 जानेवारीपासून नियमितपणे वर्ग सुरू केले जात आहेत. त्याकरिता लवकरच मार्गसूची जारी करण्यात येईल. उर्वरित वर्गांसाठी शाळा सुरू करण्याबाबत किंवा त्यांना उत्तीर्ण-अनुत्तीर्ण करण्यासंबंधी बैठकीत चर्चा झालेली नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 1 जानेवारीपासून शाळेच्या आवारात विद्यागम योजना पुन्हा सुरू केली जाईल. विद्यार्थ्यांनी विद्यागमसाठी हजर होताना पालकांचे संमतीपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे. कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन मध्यान्ह आहार योजना तुर्तास तरी सुरू केली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘फूड किट’ वितरीत केले जातील.
वसती शाळा आणि विद्यार्थी वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी 72 तास अगोदर कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
बैठकीप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री डॉ. के. सुधाकर, राज्य सरकारचे अप्पर मुख्य सचिव पी. रविकुमार, शिक्षण खात्याचे मुख्य सचिव एस. उमाशंकर तसेच विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.









