ऑनलाइन टीम / मुंबई :
पोलिस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल. तसेच महाराष्ट्र पोलिस दलाला आवश्यक असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली. महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या समारंभात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली.
या संचलनात राज्यातील विविध जिह्यातून आलेल्या पोलिस वाद्यवृंद पथकांनी संस्मरणीय अशा धून सादर करून रंग भरला. तर विशेष सुरक्षा विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी निगडित प्रात्यक्षिकांनी थरार निर्माण केला.
यावेळी संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलिस दलातील वरी÷ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.









