भारतात लसीकरणाच्या पूर्वतयारीला वेग : जानेवारीत देशभरात सुरू होणार मोठी मोहीम
नववर्ष नजीक येताच आता कोरोना लसीचे स्वप्न सत्यात उतरताना दिसू लागले आहे. देशात लवकरच लसीला मंजुरी मिळू शकते. परंतु त्यापूर्वीच देशात लसीकरणाची मोठय़ा स्तरावर तयारी सुरू करण्यात आली आहे. सोमवारी भारतात काही ठिकाणी लसीकरणासंबंधी एक ड्राय रन केले जात असून यात लस केंद्रापासून कुठल्याही व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या पूर्ण प्रक्रियेची पडताळणी करण्यात येणार आहे.
जानेवारीत कुठल्याही स्थितीत देशाला लस मिळणार असल्याचे सरकारने यापूर्वीच म्हटले आहे. कुठल्याही व्यक्तीपर्यंत लस पोहोचविण्यापूर्वी एक दीर्घ प्रक्रिया देखील आहे. लसीची साठवणूक, राज्यांमध्ये लस पोहोचविणे आणि नंतर जिल्हा, शहर, गावपातळीपर्यंत ती पोहोचवावी लागणार आहे.
कोरोनाची लस देण्यासाठी केंद्र सरकारने कोविन ऍप तयार केले असून त्यालाही ड्राय रनमध्ये पडताळून पाहिले जाणार आहे. ड्राय रनदरम्यान येणाऱया अडचणी, अनुभव आणि लागणारा वेळ यासंबंधी अहवाल तयार करण्यात येणार आहे. यावर राष्ट्रीय तज्ञांचे पथक मंथन करून लसीकरणासंबंधी पूर्ण योजनेवर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
देशात सध्या 3 लसी महत्त्वाच्या टप्प्यांवर पोहोचल्या आहेत.

यात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्ड लस सीरम इन्स्टीटय़ूटकडून निर्माण केली जात आहे. भारत बायोटेकेची कोवॅक्सीन आणि फायजरच्या लसीसाठी आपत्कालीन वापराची मंजुरी मागण्यात आली आहे. प्रारंभिक काळात 30 कोटी लोकांपर्यंत लस पोहोचविण्याचे लक्ष्य आहे. यात आरोग्यकर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, अन्य कोरोना योद्धे आणि वृद्ध लोक सामील असतील. एखादा आजार असलेल्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी 1 कोटी डोस राखून ठेवले जाणार आहेत. भारतात लसीकरणाची अंतिम तयारी सुरू असताना अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांमध्ये आतापर्यंत लाखो लोकांना लस देण्यात आली आहे.









