बघता बघता वर्ष संपले. या वषीही कोरोनाच्या दुष्ट विषाणूने साऱया जगभरातील लोकांचा पिच्छा पुरवला. पुढील वषी काय होईल ते सांगता येत नाही. कारण ‘ओमिक्रॉन’ नांवाचा अजून एक विषाणू आता जगाला ग्रासतोय. गेल्या दोन वर्षांत कोरोना आणि लॉकडाउन वगैरे गोष्टींनी जगातील सर्वच देशांतील अर्थकारण खराब केले. आत्ता कुठे हळूहळू काही देश सावरू लागले आहेत. अर्थातच प्रगत, विकसनशील आणि मागास अशा तीन गटांत ते विभागले आहेत आणि त्यांचे सावरणे हे त्या त्या गटानुसार आहे.
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या अहवालानुसार 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत 5.9 टक्के वाढ अपेक्षित होती, तर 2022 मध्ये ती 4.9 टक्के आहे, म्हणजे पुढचे वर्ष पीछेहाटीचे आहे असे सोप्या शब्दांत म्हणता येईल. ही घसरण होण्याचे कारण चमत्कारिक आहे, ते महामारीशी संबंधित आहे, कारण त्याच काळातील बंदमुळे अर्थचपे थांबली आणि ती पुन्हा पूर्वीच्या वेगाने फिरू लागण्यास पुष्कळ काळ लोटणार
आहे.
कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था तेवढय़ा एकटय़ाच देशावर आधारित किंवा अवलंबून नसते. जगातील अनेक देशांबरोबर परस्परांचे संबंध असतात. सर्वत्रच व्यवहार ठप्प झाल्याने ते पुन्हा सुरू होताना अनेक अडचणी आल्या. प्रगत राष्ट्रांमध्ये पुरवठा साखळीत खंड पडल्याने उत्पादन प्रक्रिया मंदावली. कच्च्या मालाचा पुरवठा प्रामुख्याने मागास आणि गरीब देशांकडून केला जातो. महामारी आणि तीवरील लॉकडाउनसारख्या उपाययोजनांनी त्या देशांचे कंबरडेच मोडले. परिणामी पाहिजे त्या प्रमाणात कच्च्या मालाचा पुरवठा होऊ शकला नाही. नित्योपयोगी वस्तूंच्या पुरवठय़ावर परिणाम झाला.
पुरवठा साखळीत व्यत्यय आला की वस्तूंच्या किमती वाढतात म्हणजे महागाई होते, त्याचवेळी दीर्घकालीन बंदमुळे बेरोजगारी वाढली आणि महागाईची तीव्रता वाढली. जगाच्या काही भागांत, विशेषतः प्रगत राष्ट्रांत महागाईची तीव्रता फार नाही, गरीब देशांत ती साहजिकच जास्त आहे. अन्नपदार्थांचे वाढलेले दर, इंधनांचे भडकलेले भाव आणि विनिमय मूल्यातील घसारा या कारणांनी आयात मालाच्या किमती वाढल्याचे चित्र जगभर दिसत आहे. यातच पुरवठय़ाबद्दलच्या अनिश्चिततेची भर पडली आहे.
येणाऱया काळातील आर्थिक स्थिती कशी असेल याचा अंदाज घेणाऱया ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या अहवालाने महागाई, बाजारपेठेची अनिश्चितता, पुरवठा साखळीतील खंड हे भविष्यावर परिणाम करणारे घटक असतील असे नमूद केले आहे. आगामी वर्षात अन्नसुरक्षा कमी असेल. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये बेरोजगारी फोफावली आहे, लसीकरण अपुरे झाले आहे आणि संरचनात्मक कामे करण्यास पैसा नाही.
‘जागतिक आर्थिक सहकार्य व विकास संघटने’च्या मते (OECD) वरील परिस्थितीशिवाय आणखी एक वास्तव समोर आले आहे. एकीकडे विकास होत आहे, पण आर्थिक परिस्थितीतील सुधारणा असंतुलित आहे. कोणत्याही देशातील सरकारला आपली धोरणे आखताना प्राप्त परिस्थितीचा विचार करावाच लागतो. अर्थातच अस्थिरतेमुळे धोरणे आखणे अवघड बनले आहे.
अशा प्रकारच्या साथरोगांच्या परिस्थितीत आर्थिक धोरणांच्या आखणीत आरोग्यविषयक बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्या लागतात. सुधारणांकरिता मानवी आरोग्य चांगले हवे आणि त्यासाठी ‘नाणेनिधी’ने एक अब्ज लसीकरण उद्दिष्ट ठेवले होते, 50अब्ज डॉलर हा प्रस्तावित खर्चाचा आकडा होता, हे साध्य करण्यासाठी परिस्थिती सुधारण्यासाठी करावयाच्या एकूण खर्चाच्या 70 टक्के खर्च आरोग्यविषयक बाबींवर करावा लागेल.
परिस्थिती सुधारण्यासाठी करावयाच्या कठोर आर्थिक उपायांचा कदाचित रोजगारनिर्मितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. महामारीइतक्मयाच गांभीर्याने चर्चिला जाणारा विषय म्हणजे पर्यावरणाचा. अलीकडेच झालेल्या ‘सीओपी 26’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत याची व्यापक चर्चा झाली. प्रदूषणकारी घटकांची निर्मिती करणारी उत्पादने आणि उत्पादन पद्धती यांच्याकडून बिगर प्रदूषक घटकांकडे वाटचाल करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत नव्या कार्बनविरहित उत्पादन व्यवस्थेच्या उभारणीसाठी मोठय़ा मनुष्यबळाची आवश्यकता आहे. प्रचलित कार्बनप्रधान उत्पादन व्यवस्थेत असणारे मनुष्यबळ कार्बन विरहित उत्पादन व्यवस्थेकडे स्थलांतरित होईल, याबरोबरच नव्या रोजगाराची निर्मिती होईल. ही या विपरीत परिस्थितीत मोठीच दिलासादायक गोष्ट म्हणावी
लागेल.
नव्या वर्षाच्या स्वागताचा दिवस जवळ आला आहे. त्याला सामोरे जाताना नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागण्याची परिस्थिती कधी नव्हे इतक्मया अधिक प्रमाणावर यावेळी आली आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा परवलीचा शब्द बनला आहे. हे नवे संशोधन माणसाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेवर मात करणार का, इथपासून मनुष्याच्या रोजगारप्राप्तीवर तिचे काही दुष्परिणाम होतील का इथपर्यंत अनेक प्रश्न आज विचारवंतांना पडले आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या वापरामुळे स्पर्धक व्यक्ती, उद्योग, संस्था आणि देश यांच्यावर मात करणे सोपे होईल का ही भीती आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रराष्ट्रांतील शत्रुत्वाचे प्रमाण वाढेल का, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयाचे ज्ञान आणि प्राविण्य असणाऱया राष्ट्रांची शिरजोरी वाढेल का, त्यांच्याभोवती नवे ध्रुवीकरण होऊ लागेल का, अशा प्रश्नांनी शहाण्या माणसांना अस्वस्थ केले आहे.
साथरोगाने निर्माण केलेली दुःस्थिती, तंत्रज्ञानाच्या अतिप्रगतीने उभी केलेली आव्हाने आणि परिस्थिती पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी चालवलेली धडपड यांसह नव्या वर्षात पदार्पण करावयाचे आहे. नववर्षाच्या शुभेच्छा!
राजेंद्रप्रसाद स. मसुरकर









