महसूल वाढीसाठी मनपाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. 154 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी नववर्षाच्या मुहुर्तावर लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. दि. 1 जानेवारी रोजी बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले भाजीमार्केटमध्ये 59 गाळे व 2 गोडाऊनचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांच्या माध्यमातून मनपाला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, काही गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले नसल्याने मनपाचा महसूल बुडत आहे. भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या गाळय़ांची मुदत पूर्ण झाल्याने नव्याने भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटमधील 59 गाळे यापूर्वी भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पण सदर गाळय़ांचा वापर बैठय़ा व्यावसायिकांसाठी करण्यात येत होता. मात्र, व्यापारी संकुलाच्या बाहेर फेरीवाले व भाजी विपेते बसून व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे संकुलातील गाळेधारकही रस्त्यावर बसून व्यवसाय करीत आहेत. परिणामी संकुलाच्या आतील भागात असलेल्या गाळय़ांचा वापर होत नव्हता. केवळ साहित्य ठेवण्यासाठी गाळय़ांचा उपयोग करण्यात येत आहे. सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच उपाययोजना राबविण्यात आली नव्हती. गाळे खुले असल्याने गैरवापर होत होता. काही गाळय़ांची मुदत संपल्याने संकुलामध्ये अवैध व्यवसाय सुरू होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी व्यापारी संकुलाचा ताबा घेऊन प्रवेशद्वारावर दरवाजे बसविण्यात आले होते. सुरक्षेच्यादृष्टीने संकुलातील गाळय़ांना लोखंडी अँगल बसवून बंदिस्त करण्यात आले आहे. त्यामुळे गाळेधारकांना सोयीचे होणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी सज्ज झाल्याने लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
येथील 59 गाळे व दोन गोडाऊन भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. सकाळी 11 पासून या प्रक्रियेला प्रारंभ होणार असून, महात्मा फुले भाजी मार्केटच्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अनामत रक्कम भरण्यास वेळ देण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता लिलावाकरिता बोली लागणार आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. गाळय़ासाठी 20 हजार रुपये अनामत रक्कम आणि 2640 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. 12 वर्षांकरिता सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.









