प्रतिनिधी / सांगली
शहरात गुरुवारी मोठ्या भक्तीभावात घटस्थापनेने व देवीच्या प्रतिष्ठापनेने सर्वत्र नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. सांगलीकरांनी घरोघरी घटस्थापना केली. घटपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी गुरुवारी दिवसभर मारुती चौकात गर्दी होती. घट बसवण्याबरोबरच अनेक मंदिरांतील व काठी सार्वजनिक मंडळातील देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेने नवरात्रौत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पत्रावळीमध्ये मातीच्या ढिगाऱ्यात लोटके ठेवून त्यावर नारळ ठेवण्यात आले व घटाभोवती नवप्रकाराचे विविध कडधान्ये टाकून घरोघरी भक्तिभावाने घट बसवण्यात आले.
शहरातील काही ठराविक नवरात्रौत्सव मंडळांनी जय दुर्गामाता-जय अंबामाताच्या जयघोषात देवीची प्रतिष्ठापना केली. शहर परिसरात प्रतिवर्षी ५० च्या आसपास मंडळांमध्ये मुर्ती प्रतिष्ठापना केली जाते, पण यंदा महापूर व कोरोनामुळे या मंडळामध्ये घट दिसून आली. दिवसभर अनेक महिलांनी घरोघरी घट बसवून घटाची पूजा करून देवीची आरती केली घटस्थापनेची परंपरा चंदाठी महिलांनी मोठ्या उत्साहात जपत घरोघरी घट बसवले. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने काहींनी नऊ दिवस उपवास घरले आहेत. त्यामुळे उपवासाचे साहित्य व घटपुजनाच्या साहित्य खरेदीसाठी मारुती चौक परिसरात लोकांची दिवसभर गर्दी होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणारी सर्व मंदिरे गुरुवारी घटस्थापनेच्या मुहुर्तावर उघडण्यात आली. शहरातील दुर्गामाता मंदिर, ग्रामदेवता केंगणेश्वरी मंदिर, खणभागातील रेणुका मंदिर, गावभागातील रेणुका मंदिर रतनशीनगर येथील अंबाजी मंदिर, कुपवाड रोडवरील रेणुका मंदिर, लाले प्लॉट येथील व्यंकटेश मंदिर येथे सकाळी पारंपारीक पूजा व अभिषेक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यंदाही कोरोनामुळे रास-दांडीयाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शिवप्रतिष्ठानतर्फे निघणारी दौडही रद्द झाल्याने अनेक भाविकांनी व धारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
Previous ArticleNavaratri : यंदा नवरात्रचा उपवास महागला
Next Article उद्योगाला चालना देण्यासाठी पॅसेंजर गाडय़ा सुरू करा








