- नियम, सूचना न पाळणाऱ्या मंडळावर होणार कारवाई
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचे नाव नाही. त्यामुळे यंदा सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सरकार कडून करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर यंदा दांडिया खेळला जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.
17 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. आणि या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबई महापालिकेने नियमावली जारी केली आहे. या नवीन नियमावलीनुसार, या वर्षी देवीची घरगुती मूर्ती दोन फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फूटच ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक मंडप उभारण्यासाठी 30 सप्टेंबरपासून परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गतवर्षी परवानगी घेतलेल्या मूर्तीकारांना यंदा स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांची परवानगी घ्यावी लागणार नाही. मात्र नवीन मूर्तीकारांना या परवानग्या घेणे बंधनकारक असेल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणार असल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.
पारंपरिक मूर्तिकारांना परवानगी देण्यात येत असून अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती विक्रीसाठी मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
- असे आहेत नियम…
- यावर्षी गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही. तसेच सार्वजनिक मंडळांनी देवीच्या ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी लागेल.
- देवीच्या आगमन, विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे.
- मंडपात थर्मल स्क्रिनिंग, निर्जंतुकीकरणची व्यवस्था असावी. तसेच मंडपात एकावेळी पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते नसावे.
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करावे.