वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतील महत्त्वाची भारत-पाकिस्तान लढत अहमदाबादमध्ये होणार असून नवरात्रीच्या उत्सवाच्या सुऊवातीच्या दिवसामुळे ती 14 ऑक्टोबर अशी एक दिवस आधी खेळविली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या सामन्याची वाट पाहणाऱ्या क्रिकेटरसिकांना त्रास होऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ आणि बीसीसीआयने गेल्या महिन्यात विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले होते आणि अहमदाबादमध्ये असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमवर वरील सामना ठेवण्यात आलेला आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अहमदाबादमधील हॉटेल्स आणि हवाई प्रवासाचे भाडे गगनाला भिडले होते. जर हा सामना एका दिवसाने पुढे सरकवला, तर चाहत्यांची आणखी परीक्षा लागण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 15 ऑक्टोबर हा नवरात्रोत्सवाचा सुऊवातीचा दिवस असल्याने सुरक्षा यंत्रणांनी या मोठ्या सामन्याची तारीख बदलावी असा सल्ला दिला आहे. कारण या सामन्यावेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तैनात करण्याची आवश्यकता भासेल. गरज भासल्यास तारीख बदलण्याबाबत निर्णय घेण्यासाठी ‘आयसीसी’ला ‘बीसीसीआय’सोबत चर्चा करावी लागेल.
आणखी चर्चा आवश्यक आहे, असे आयसीसीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरून इतरत्र जाणार नाही, पण चाहत्यांना त्यांच्या प्रवासाच्या योजना बदलण्याची गरज भेडसावू शकते. भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्यांचा पहिला विश्वचषक सामना खेळेल, तर पाकिस्तानचे पहिले दोन सामने 6 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना एक दिवस आधी ठेवल्याने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघावरही परिणाम होऊ शकतो. कारण त्यांना या ‘हायप्रोफाइल’ लढतीच्या तयारीसाठी एक दिवस कमी मिळेल.









