दुर्गादेवीच्या मूर्ती लागल्या साकारू, मंदिर रंगरंगोटीचे काम जोमात
प्रतिनिधी /बेळगाव
नवरात्रोत्सव अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नवरात्रीच्या तयारीला वेग आला आहे. दुर्गादेवीच्या मूर्ती आता साकारत असून त्यांना रंग देण्याचे काम सुरू होणार आहे. शहर व परिसरातील मंदिरांमध्ये स्वच्छतेचे काम वेगाने सुरू असून रंगरंगोटी देखील केली जात आहे. कोरोनाचे संकट बाजूला सारून प्रत्येकाला आता नवरात्रीची आस लागली आहे.
नवरात्रीत नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. विविध रूपांमध्ये देवीची आरास केली जाते. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच आता गल्लोगल्ली दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रति÷ापना केली जाऊ लागली आहे. याचसोबत कोलकाता परिसरातील नागरिक बेळगावमध्ये हिंडाल्को, सांबरा एअरफोर्स व हिंदवाडी येथे मोठय़ा प्रमाणात उत्सव साजरा करतात. कोरोनामुळे मागील वषी या उत्सवाला बेक लागला होता. परंतु यंदा मात्र उत्साहाने तयारी केली जात आहे.
बेळगाव शहरात किल्ला येथील दुर्गादेवी, समादेवी गल्ली येथील समादेवी, जालगार गल्ली येथील कालिकादेवी, भांदूर गल्ली येथील मरगाई देवी, तानाजी गल्ली येथील यल्लम्मादेवी, कॅम्प येथील मरिअम्मा, कुंतीदेवी, शहापूर येथील अंबाबाई, महालक्ष्मी मंदिर, हिंदवाडी येथील महालक्ष्मी, वडगाव येथील अंबाबाई व बनशंकरी, जुने बेळगाव येथील लक्ष्मीदेवी, अनगोळ येथील महालक्ष्मी या प्रमुख मंदिरांमध्ये साफसफाईचे काम सुरू असून रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली आहे.
मिरज, निपाणी येथूनही मूर्तींना मागणी
नवरात्रोत्सव अवघ्या आठवडाभरावर आला असून दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम जोर धरू लागले आहे. यावर्षी बेळगाव सोबतच मिरज, निपाणी, संकेश्वर येथूनही मूर्तींची ऑर्डर आली आहे. फिनिशिंग दिल्यानंतर रंगकामाला सुरुवात करण्यात येईल.
मूर्तीकार विनायक पाटील (भांदूर गल्ली)