प्रतिनिधी/ बेळगाव
नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठही सज्ज झाली आहे. नवरात्रीचे विविध साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. मात्र यंदा पोषाख, टिपरी, दागिने या गरबा दांडियासाठीच्या साहित्यापेक्षा पूजा साहित्य खरेदीवर भर देण्यात आला आहे.
नऊ दिवस देवीचा जागर होतो आणि घट बसविला जातो. यासाठी बाजारपेठेत घट आले आहेत. त्याबरोबरच अखंड दीप तेवत ठेवण्यासाठी पणत्या आल्या आहेत. देवीचे मुखवटे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. देवीच्या सजावटीसाठी मोत्याच्या माळा व अन्य सजावटीचे साहित्यही दाखल झाले आहे.
देवीची नऊ दिवस विविध स्वरुपात पूजा केली जाते. त्यासाठी विविध नमुन्याच्या खणाच्या व जरीकाठाच्या साडय़ांची खरेदी सुरू झाली आहे. शहरातील अनेक देवींच्या मंदिरांच्या दारात या साडय़ांची तसेच पूजा साहित्याची खरेदी सुरू आहे.
घटस्थापनेदिवशी धान्य पेरले जाते. यासाठी नऊ प्रकारची धान्येसुद्धा बाजारपेठेत मिळत आहेत. गेजवस्त्र, वाती, कापसाचे हार यासह पूजा साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. मात्र परगावच्या लोकांनी ही खरेदी अमावस्येपूर्वी उरकून घेतली आहे. तर अनेकांनी शनिवारी खरेदी करण्याचे ठरविले आहे.
फुलांच्या बाजारपेठेत झेंडू, शेवंती या फुलांची आवक वाढली आहे. त्याचबरोबर अन्य फुलेसुद्धा मापानुसार उपलब्ध आहेत. फळ बाजारपेठेतही फळांची आवक वाढली आहे. नवरात्रीमध्ये पूजा साहित्याबरोबरच दंडियाच्या साहित्याला मागणी असते. यंदा मात्र हे साहित्य विकणाऱया विपेत्यांचा कोरोनाने हिरमोड केला आहे.









